अ‍ॅपशहर

नाशिककर चाखताहेत ताडीचा गूळ

भारतीय आहारात प्राचीन काळापासून गूळ महत्त्वाचा मानला जातो. मात्र, सध्या नाशिकमध्ये चर्चा आहे ती तामिळनाडूतून आलेल्या 'ताडी'च्या गुळाची.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 8 Feb 2021, 8:38 am
पंकज चांडोले, नाशिक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम नाशिककर चाखताहेत ताडीचा गूळ


भारतीय आहारात प्राचीन काळापासून गूळ महत्त्वाचा मानला जातो. मात्र, सध्या नाशिकमध्ये चर्चा आहे ती तामिळनाडूतून आलेल्या 'ताडी'च्या गुळाची. या गुळाने नाशिककरांना भूरळ घातली असून, ताडीच्या फळापासून तयार झालेला या गुळाची चव कमालीची पसंतीस पडली आहे. त्यामुळेच थेट तामिळनाडूतून आलेल्या ७५ हून अधिक विक्रेत्यांकडील पानांच्या पिशव्यांमध्ये ठेवलेला गूळ घेण्यासाठी उत्सुकता नाशिककरांमध्ये पहायला मिळत आहे.

गूळ हे ऊर्जेचे प्रतिक असून विशेषत: गूळ गरम असल्याने हिवाळ्यात सर्वाधिक सेवन केले जाते. हेच कारण साधत तामिळनाडू राज्यातील काही विक्रेते नाशिकमध्ये गूळ विक्रीसाठी आले आहेत. नारळाप्रमाणे ताडही महत्त्वाचा व उपयुक्त वृक्ष असून, त्यातील शर्करायुक्त रस ही मुख्य उत्पन्नाची बाब आहे. या वृक्षाचे फुलोरे महाछदातून बाहेर पडण्यापूर्वी त्यांना खाचा पाडून त्याखाली बांधलेल्या मडक्यात पाझरणारा गोड रस जमा केला जातो. हा रस उकळवून गूळ व साखर तयार केली जात असल्याचे हे विक्रेते सांगतात. प्रामुख्याने तामिळनाडूमध्येच या गुळाचे उत्पादन होत असून, करोनानंतर उपजिविकेसाठी त्यांनी विविध शहरात गुळाची विक्री सुरू केली आहे. ताडीचा साधा गूळ १४०, तर आलेयुक्त गूळ २४० रुपये किलो दराने विक्री केली जात असून, नाशिककर कुतूहल आणि नव्या चवीसाठी त्याची खरेदी करताना दिसत आहेत.

असे आहेत फायदे

शरीरातील साखर, रक्तदाब नियंत्रित राहतो. अॅसिडिटी होत नाही. हाडे मजबूत होतात. यामध्ये आलं, काळीमिरी, वेलची, लवंग, तुळस, धने आणि मधाचा वापर करुन एक गुळ तयार केला आहे. याला आल्याचा गुळ म्हटले जात असून, 'ब्लॅक टी व कॉफी'साठीच त्याचा वापर केला जात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

ताडीच्या झाडापासून तयार केलेल्या औषधी गुळाची विक्री करत आहोत. आणलेला माल संपेपर्यंत एका शहरात थांबू. नाशिकमध्ये या गुळाची विक्री चांगली होत आहे. त्यामुळे मार्चमध्ये पुन्हा येण्याचे नियोजन आहे.

- एम. कालिराज, गुळ विक्रेता

ताडीचा गूळ नियमित गुळाप्रमाणेच आहे. त्याचे गुणधर्म नेहमीच्या गुळाप्रमाणेच आहेत. अर्थात, तामिळनाडूत त्याचे महत्त्व अधिक आहे. पचनशक्ती सुधारण्यासह पोटाचे त्रास कमी करण्यात हा लाभदायक असेल. उत्तेजना देणारा हा गूळ असतोच. पण, शास्त्रीयदृष्टीने संशोधन केल्यास या गुळाला प्रकाशझोकात आणता येईल.

- विक्रांत वैद्य, आयुर्वेदाचार्य

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज