अ‍ॅपशहर

कुठे गेले डॉर्निअर विमान?

नाशिक : इतरांचे जाऊ द्या, आम्हीच आमच्या १९ आसनी विमानाद्वारे प्रवासी सेवा देतो, असे सांगणारे हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) आता तोंडघशी पडले आहे. कारण, कानपूरच्या कारखान्यात तयार झालेले डॉर्निअर विमान अद्यापही ओझर एचएएलच्या ताब्यात आलेले नाही.

भावेश ब्राह्मणकर | Maharashtra Times 31 Aug 2017, 4:00 am
नाशिकची विमानसेवा अजूनही अधांतरितच; ‘एचएएल’लाच नाही थांगपत्ता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nashik air service on waiting
कुठे गेले डॉर्निअर विमान?


‘नाशिकला आता विमानसेवा सुरू होणार’, ‘तेव्हा होणार’, या आणि अशा प्रकारच्या वार्ता वारंवार येऊन गेल्या. विविध कारणे पुढे केल्यानंतरही विमानसेवा अद्यापही ‘हवेत’च आहे. सप्टेंबर तोंडावर येऊन ठेपल्यानंतरही ‘उडान’ होण्याची चिन्हे नाहीत. या पार्श्वभूमीवर विमानसेवेचा परामर्श घेणारी मालिका आजपासून.

नाशिक : इतरांचे जाऊ द्या, आम्हीच आमच्या १९ आसनी विमानाद्वारे प्रवासी सेवा देतो, असे सांगणारे हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) आता तोंडघशी पडले आहे. कारण, कानपूरच्या कारखान्यात तयार झालेले डॉर्निअर विमान अद्यापही ओझर एचएएलच्या ताब्यात आलेले नाही. परिणामी, ओझरहून सेवा सुरू करण्याची एचएएलची घोषणा पोकळच ठरली आहे.

राज्य सरकारने पर्यटन खात्यांतर्गत तब्बल ८४ कोटी रुपये खर्चून ओझर विमानतळाच्या ठिकाणी अत्याधुनिक पॅसेंजर टर्मिनल साकारले आहे. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर म्हणजेच ३ मार्च २०१४ रोजी या टर्मिनलचे लोकार्पण करण्यात झाले. दीड वर्षे वाद मालकीचा वाद रंगल्यानंतर अखेर नाममात्र दराने हे टर्मिनल एचएएलकडे हस्तांतरीत करण्यात आले. आता त्यास दोन वर्षे उलटूनही प्रवासी विमानसेवा सुरू होऊ शकलेली नाही. परिणामी, एचएएलला पॅसेंजर टर्मिनलचा पांढरा हत्ती पोसावा लागत आहे.

लढाऊ विमानांची निर्मिती एचएएलकडून केली जाते. हवाईदल आणि नौदलासाठी १९ आसनी डॉर्निअर विमानाची निर्मिती एचएएलने यापूर्वीच केली आहे. याच धर्तीवर प्रवासी वाहतुकीसाठी एचएएलच्या कानपूर येथील कारखान्यात दोन डॉर्निअर विमानांचे उत्पादन करण्यात आले आहे. एचएएलचे चेअरमन टी सुवर्ण राजू यांनी मार्च महिन्यात या विमानांची पाहणीही केली. ही विमाने ११ मे रोजी ओझर एचएएलच्या ताब्यात देण्यात येतील, असेही त्यांनी जाहीर केले. त्यानंतर एप्रिलमध्ये खासदार हेमंत गोडसे यांनी ओझर एचएएलला भेट देऊन विमानसेवेबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. याच भेटीत एचएएलचे महाव्यवस्थापक बी. व्ही. पी. शेषागिरीराव यांनी स्पष्ट केले की, कानपूर येथील कारखान्यात प्रायोगिक तत्त्वावर दोन प्रवासी विमानांचे उत्पादन घेण्यात येत आहे. एक मे रोजी ही दोन्ही विमाने ओझर एचएएलकडे येणार आहेत. ही विमाने प्रवासीसेवा देणाऱ्या हवाई कंपन्यांना भाडेतत्त्वावर देण्यास आमचे प्राधान्य राहील. शिवाय एचएएलही विमानसेवा सुरू करण्याबाबत विचाराधीन आहे. नाशिकहून मुंबई, पुणे ऐवजी नाशिक दिल्ली किंवा हैदराबाद या मार्गांवर सेवा सुरू करण्याचा आमचे प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आता ऑगस्ट महिना सरत आला असतानाही ही डॉर्निअर विमाने ताब्यात आली नसल्याचे निदर्शनास येत आहे.

एचएएल अधिकाऱ्यांचे तोंडावर हात

डॉर्निअर विमानासंदर्भात एचएएलच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत न बोलणेच पसंत केले. काहींनी याविषयी माहिती घेऊन सांगू असे स्पष्ट केले. कानपूरला विमाने सज्ज असताना ती ओझरला का येऊ शकलेली नाहीत? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. खासगी कंपन्यांच्या सेवेला डॉर्निअर विमानांचा सक्षम पर्याय उपलब्ध होणे शक्य आहे. मात्र, या साऱ्या प्रक्रियेत प्रचंड हलगर्जीपणा असल्याने प्रत्यक्षात ही सेवा सुरू होऊ शकलेली नाही.

(क्रमशः)

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज