अ‍ॅपशहर

कलाक्षेत्रातील ‘दादा’माणूस गेला

प्रख्यात कलादिग्दर्शक अरूण रहाणे यांचे आकस्मिक निधन झाले. कलावंत म्हणून अरूण रहाणे मोठे होतेच, परंतु माणूस म्हणूनदेखील ते खूप लोकप्रिय होते.

Maharashtra Times 21 Jun 2017, 4:09 am
प्रख्यात कलादिग्दर्शक अरूण रहाणे यांचे आकस्मिक निधन झाले. कलावंत म्हणून अरूण रहाणे मोठे होतेच, परंतु माणूस म्हणूनदेखील ते खूप लोकप्रिय होते. त्यांनी कधीही कुणाला विन्मुख पाठवले नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nashik artist speak on arun rahane
कलाक्षेत्रातील ‘दादा’माणूस गेला

प्रत्येकाला मदत करण्याची त्यांची वृत्ती वाखाणण्यासारखी होती. त्यांच्या निधनामुळे नाशिकच्या कलावर्तुळावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
चित्रपट, नाटकातला माझा जुना मित्र. माझा जीवाभावाचा सखा, माझा भाऊच गेला. सातत्याने चित्रपटाच्या प्रोसेसमध्ये राहणारा, चित्रपट महामंडळाचे कार्यालय नाशिकला आणण्यासाठी त्याचा मोलाचा वाटा होता. नाशिकला चित्रपट सृष्टीचे आम्ही एकत्रित स्वप्न पाहीले होते. ते स्वप्न पूर्ण व्हायच्या आतच दादाने एग्झिट घेतली. तो असता तर मोठे काम उभे करता आले असते.

-शाम लोंढे, चित्रपट महामंडळ

नाशिकमधला सर्वात जास्त चित्रपट केलेला कलादिग्दर्शक. महागुरू चित्रपटाच्या निमित्ताने मला दादांचा अनुभव आला. मला खूप प्रोत्साहन त्यांनी दिले. कुणाच्याही मदतीला दादा कधीही तयार रहायचे. त्यांच्यामुळे खूप निर्माते, दिग्दर्शक तयार झाले. चित्रपट महामंडळाचे ऑफिस नाशिकला आणण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. चित्रपटाचा एक हक्काचा आवाज गेला. दादांचा कोल्हापूर चित्रनगरीमध्येही खूप वचक होता. त्यांचे जाणे अतिशय चटका लावून जाणारे आहे.

- सचिन शिंदे, नाट्य दिग्दर्शक

नाशिकचे मोठे नुकसान झाले. जेव्हा नाशिकची, चित्रपट क्षेत्रात घोडदौड सुरू झाली, तेव्हा अगदी राजीव पाटील यांच्यापासून सर्वांनाच त्या क्षेत्रात आणण्यात दादांचा वाटा मोठा होता. सातत्याने काम करीत राहणारे स्वामीसेवक म्हणूनही त्यांची ओळख होती. आम्हाला ‘नाशिक सोडा’चा मंत्र दादांनी दिला. कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. आता तितक्याच ताकदीने कलादिग्दर्शन क्षेत्रात कुणी उभे राहिले तर तीच दादांनी खरी श्रध्दांजली ठरेल.

- चिन्मय उदगीरकर, अभिनेता

चित्रपटक्षेत्रातला नाशिकमधला दादा माणूस गेला. चित्रपटाचे वेड त्यांनी लावले. नाशिकच्या खूप लोकांना त्यांनी प्रोत्साहित केले. कलावंत म्हणून आम्ही त्यांचे कुटूंबच होतो. ही क्षती कधीही न भरून निघणारी आहे.

-सुहास भोसले, चित्रपट दिग्दर्शक

अरूण व मी जीवाचे मित्र. कधीही कोणासाठी अरूण धावून जाणार. कित्येकांना त्याने फिल्म इंडस्ट्र‌ीत काम मिळवून दिले. कधीही कुणाला कोणत्याही गोष्टीसाठी नाही म्हणायचे नाही असा अरूण, आज आपल्यात नाही यावर विश्वासच बसत नाही. भावपूर्ण श्रध्दांजली.

-अरूण गिते, अभिनेता

हरिभाऊ जाधव, मी आणि अरूण आम्ही तिघांनी मिळून सन्मित्र नावाची संस्था स्थापन केली होती. त्यातून आम्ही खूप नाटके केली. असा एक वाल्या, सर्पफणीची सावली ही नाटके त्या काळात खूप गाजली. अतिशय अभ्यासू नेपथ्यकार, संहिता वाचणार मगच त्यावर काम करणार पण बक्षिस घेऊनच जाणार असा दादा माणूस म्हणजे अरूण.

- माणिक कानडे, रंगभूषाकार

कलादिग्दर्शक, अरूण रहाणे अष्टपैलू आणि कलाविष्काराची सखोल जाण असलेला कलावंत होता. स्थानिक पातळीवर नवोदितांच्या नाटकांचे नेपथ्य असो किंवा बिगबजेट चित्रपटांचे कलादिग्दर्शन असो, अत्यंत तळमळीने आणि प्रामाणिकपणे तो करत असे. प्रतिकुल परिस्थितीतून कलेची जोपासना करण्याचे व्रत घेऊन अरूणने अल्पावधीतच कलाक्षेत्रात आपले वेगळेपण निर्माण केले. अनेक तरूण दिग्दर्शकांना चित्रपट निर्मितीसाठी विनामूल्य कलादिग्दर्शन अरूणने केले. खेड्यापाड्यातील कलावंतांना यामुळे बळ मिळाले.

- विश्वास ठाकूर

अरूण रहाणे यांचा प्रवास जी डी आर्ट, नेपथ्य आणि मग कलादिग्दर्शक असा झाला होता. रंगतंत्राची उत्तम जाण असलेला नेपथ्यकार आपल्यातून गेला आहे. नेपथ्यकार ते कलादिग्दर्शक असा त्यांचा प्रवास होता. चित्रपटसृष्टीचा नाशिकमध्ये शिरकाव त्यांच्या माध्यमातून झाला होता. प्रॉडक्शनमध्ये काय काम करायचे हे त्यांनी शिकवले होते. एक चांगला कलादिग्दर्शक हरपला.

- प्रवीण काळोखे, दिग्दर्शक

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज