अ‍ॅपशहर

जेलची प्रतिमा बदलून देणार नवा चेहरा

राजकुमार साळी या खान्देशच्या सुपुत्राकडे सध्या या जेलची सूत्रे आली आहेत. विविध उपाययोजना करून या जेलची प्रतिमा बदलून नवा चेहरा देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी ‘मटा’शी बोलताना स्पष्ट केले.

Maharashtra Times 28 Mar 2017, 4:00 am
नाशिकरोड येथील सेंट्रल जेल अनेक कारणांनी प्रकाशझोतात असते. एकाच महिन्यात चाळीस मोबाइल सापडणे किंवा कर्मचारी-अधिकाऱ्यांवर हल्ले या कारणांनी जेल जसे चर्चेत असते, तसेच राज्यातील सर्वांत जास्त महसूल मिळविणारे, योग प्रशिक्षक कैद्यांची देशातील पहिली बॅच घडविणारे कारागृह अशा विधायक उपक्रमांनीही हे जेल चर्चेत असते. राजकुमार साळी या खान्देशच्या सुपुत्राकडे सध्या या जेलची सूत्रे आली आहेत. विविध उपाययोजना करून या जेलची प्रतिमा बदलून नवा चेहरा देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी ‘मटा’शी बोलताना स्पष्ट केले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nashikroad jails image will be change
जेलची प्रतिमा बदलून देणार नवा चेहरा


जेलमध्ये मोबाइल, गांजा नियमितपणे सापडतात. शिस्त लावण्यासाठी काय करणार?

पहिल्या दिवशी मी सर्व कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. वेळेवर कामावर येण्याच्या सूचना दिल्या. रात्र पहारेकरी (निळी टोपी) आणि सिद्धदोष अन्वेषक (वॉर्डर) यांना शासकीय पगार मिळतो. त्यांनाही अॅलर्ट राहण्याचे आदेश दिले. आक्षेपार्ह घटना घडल्यास रात्री-अपरात्री कधीही माझ्याशी संपर्क साधण्यास सांगितले आहे. मी स्वतः ६३ एकर जेलचा प्रत्येक कोपरा नजरेखालून घालत आहे. जेलचा कारभार पारदर्शी होईल, असा माझा प्रयत्न आहे.

जेल आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी काेणत्या उपाययोजना करणार?

कैद्यांकडून हल्ले व मानसिक ताणामुळे कर्मचाऱ्यांचे खच्चीकरण झाले आहे. मी मासिक बैठक घेऊन त्यांना नवा आत्मविश्वास दिला आहे. ड्युटीवर असताना कैद्याकडे मोबाइल सापडल्यास आपण निलंबित होऊ, ही भीती कर्मचाऱ्यांच्या मनात असते. त्याचा गैरफायदा कैदी घेतात. कर्मचाऱ्यांच्या मनातील ही भीती मी काढली आहे. जेलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना डोळ्यात तेल घालून ड्युटी करण्याच्या कडक सूचना केल्या आहेत.

नाशिकरोड जेलमध्ये नवीन फाशी यार्ड कधी होणार?

फाशी यार्ड सुरू करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव प्रलंबित आहे. शासन स्तरावर लवकरच कार्यवाही होईल, अशी अपेक्षा आहे.

नाशिकरोडला ११३ एकरमधील खुले कारागृह कधी साकारणार?

सध्या पैठणला खुले कारागृह आहे. त्यासाठी वेगळे बांधकाम केलेले आहे. नाशिकला तसे नाही. नाशिकरोडला खुले कारागृह सध्या सुरू आहेच. परंतु, त्याचे आकारामान छोटे आहे. त्यासाठी वेगळे बांधकाम झालेले नाही.

जेलचा महसूल वाढविण्यासाठी काय उपायोजना करणार?

महसूल उत्पादनात नाशिकरोड जेल राज्यात आघाडीवर आहे. महसूलवाढीसाठी कर्मचाऱ्यांना मार्केटिंगचे प्रशिक्षण देणार आहे. तसेच, नवीन उपाययोजना करण्याचाही विचार आहे.

कैद्यांच्या आरोग्याचे काय?

कैद्यांसाठी सध्या दोन डॉक्टर जेलमध्ये आहेत. महिला कैद्यांसाठी महिला डॉक्टर नाही. त्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे. आणखी वैद्यकीय स्टाफ उपलब्ध व्हावा आणि दवाखाना अद्ययावत व्हावा यासाठी माझे प्रयत्न आहेत. कैद्यांचे मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी गळाभेट, नातेवाइकांना थेट फोन या सुविधा सुरूच आहेत.

कैद्यांच्या आहाराच्या दर्जाबाबत तक्रारी आहेत...

आहार चांगला असेल, तर आचार आणि विचार चांगले राहण्यास मदत मिळते. जेलमधील कैद्यांच्या जेवणाचा दर्जा वाढविण्यात येईल. पोषक आहार मिळेल, याकडे लक्ष दिले जाईल. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने किचन सुधारणार आहे.

व्हीसी सुविधा व जॅमर सुरू आहेत का?

कैद्यांच्या न्यायालयीन प्रक्रियेसाठी व्हीसी सुविधा सुरू आहे. मोबाइलला अटकाव करणारे जॅमर बसविलेले असले, तरी त्यांची रेंज कमी आहे. त्यामुळे अधिक क्षमतेचे जॅमर बसविणार आहे.

कैद्यांना पॅरोल, रजा मिळत नाही, अशी तक्रार आहे...

पॅरोलचे व रजेचे अर्ज पेंडिंग आहेत. विभागीय आयुक्तांना भेटून प्रकरणे निकाली काढण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे कैद्यांचा असंतोष कमी होईल. न्यायालयात व दवाखान्यात कैदी नेण्यासाठी पुरेसे पथक उपलब्ध करावे, यासाठी पोलिस आयुक्तांची भेट घेतली आहे.

जेलच्या निलंबित अधिकाऱ्यांना पुन्हा केव्हा घेणार?

याबाबतची कारवाई शासनाने केली आहे. शासनच याबाबत निर्णय घेईल.

जेल कर्मचारी निवासस्थाने मोडकळीस आली आहेत...

याबाबत शासनाला मी विनंती करणार आहे. पालकमंत्र्यांची भेट घेऊन कर्मचारी निवासस्थांसाठी ग्रँट देण्याची विनंती करणार आहे. जेलभोवती नवीन तट बांधणार आहे.

(शब्दांकन ः डॉ. बाळकृष्ण शेलार)

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज