अ‍ॅपशहर

मनपा शाळा हुश्शार!

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत महापालिकेच्या १२७ पैकी ३३ शाळांना ‘अ’ श्रेणी प्राप्त झाली आहे. तर ‘क’ श्रेणीत सर्वाधिक ४८ शाळांचा समावेश आहे. २०११-१२ पासून गेल्या वर्षापर्यंत ‘अ’ श्रेणीत पाचवर असलेली शाळांची संख्या वाढल्याने महापालिका शाळांमध्ये गुणवत्तेबाबत सकारात्मक बदल दिसून येत आहेत.

अश्विनी कावळे | Maharashtra Times 19 Nov 2017, 4:24 am
ashwini.kawale@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nmc school top
मनपा शाळा हुश्शार!

Tweet : ashwinikawaleMT

नाशिक : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत महापालिकेच्या १२७ पैकी ३३ शाळांना ‘अ’ श्रेणी प्राप्त झाली आहे. तर ‘क’ श्रेणीत सर्वाधिक ४८ शाळांचा समावेश आहे. २०११-१२ पासून गेल्या वर्षापर्यंत ‘अ’ श्रेणीत पाचवर असलेली शाळांची संख्या वाढल्याने महापालिका शाळांमध्ये गुणवत्तेबाबत सकारात्मक बदल दिसून येत आहेत.

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या राज्य शिक्षण विभागाच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमातून राज्यातील शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणीसारखे उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्यभरात श्रेणी तपासण्यासाठी मूल्यमापन प्रक्रियाही राबविण्यात येते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकाधिक शाळा ‘अ’ श्रेणीत असाव्यात यासाठीही विशेष उपाययोजना राबविण्यात येत आहे. सामूदायिक सादरीकरण, सामूदायिक धडा वाचन, दिलेल्या विषयावर पाच वाक्य लिहिणे, वर्गातील वस्तूंवर वाक्य लिहिणे, शाळा स्वच्छता, तंत्रज्ञानाचा वापर आदी निकषांच्या आधारे मूल्यमापन करून शाळांना श्रेणी दिली जात आहे. यामध्ये पाच-सहा वर्षांपासून महापालिकेच्या ‘अ’ श्रेणीत केवळ पाच असलेली शाळांची संख्या यंदा ३३ झाली आहे. महाराष्ट्र विद्या प्राधिकरण यांच्यातर्फे पार पाडले जात असलेल्या या सर्वेक्षणात ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील शाळांची प्रगती धिम्या गतीने होत असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे या भागातील विशेष लक्ष केंद्रीत केले जात असल्याचे सांगितले जात आहे.

असे होते गुणांकन
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शाळांचे विशिष्ट प्रकारे गुणांकन केले जाते. १२५ पेक्षा ८० आणि त्यापुढील गुण असलेल्या शाळांना ‘अ’ श्रेणी, ६१ ते ८० ‘ब’ श्रेणी, ६० ते ४१ ‘क’ श्रेणी व त्याखालील गुण असलेल्या शाळांना ‘ड’ श्रेणी प्राप्त होत असते.

महापालिकेच्या ‘अ’ श्रेणीतील शाळांची संख्या गेल्या वर्षीपर्यंत पाच इतकीच होती. आता सर्व निकषांची पूर्तता करून गुणवत्तेवर भर देऊन ही संख्या ३३ पर्यंत पोहोचू शकली आहे. पुढील वर्षापर्यंत महापालिकेच्या शंभर टक्के शाळा ‘अ’ श्रेणीत असाव्यात यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी विशेषतः ‘ड’ श्रेणीतील शाळांवर लक्ष्य केंद्रीत करण्यात आले आहे.
- नितीन उपासनी,
प्रशासनाधिकारी, महापा‌लिका शिक्षण समिती

मनपा शाळांची ‘गुण’वत्ता
श्रेणी शाळा संख्या
अ ३३
ब २२
क ४८
ड २४
एकूण १२७

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज