…
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
परराज्यातून येणारा लाखोंचा मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जप्त केला. या कारवाईत गुजरातमधील एकास अटक करण्यात आली असून, त्याच्या ताब्यातील कार हस्तगत करण्यात आली आहे. ही कारवाई एक्साइज विभागाच्या विभागीय भरारी पथकाने केली. अंकितभाई नटूभाई पटेल असे मद्याची वाहतूक करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. निवडणूक निकालामुळे गुरुवारी शहरासह जिह्यात ड्राय डे पाळला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मद्याची वाहतूक केली जात होती. उपआयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली उंबरठाण बर्डीपाडा मार्गावरील गोंदुणे (ता. सुरगाणा) येथील हडकाईचोंड चौफुलीवर गुरुवारी सापळा लावला असता सायंकाळी संशयित पथकाच्या जाळ्यात अडकला. संशयित वॅगन आर कार (जीजे १५/सीएफ २७९२) मधून मद्याची वाहतूक करीत होता. कारमध्ये दमननिर्मित व्हिस्की आणि बीअर असा १ लाख २२ हजार ४०० रुपयांचा मद्यसाठा आढळला. पथकाने कारसह मद्यसाठा असा सुमारे ५ लाख २२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, दुय्यम निरीक्षक देवदत्त पोटे तपास करीत आहेत. निरीक्षक एम. बी. चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक एस. एस. रावते, देवदत्त पोटे, जवान कैलास कसबे, अमित गांगुर्डे, दीपक आव्हाड, अमन तडवी, विठ्ठल हाके आदींच्या पथकाने ही कारवाई केली.