अ‍ॅपशहर

शेतकऱ्याला कांदा रडवतोय! दरात सातत्यपूर्ण घसरण, उत्पादन खर्चही निघेना

नाफेडने यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांकडून घेतलेला अडीच लाख मेट्रीक टन कांदा स्थानिक बाजारपेठेत न आणता देशांतर्गत इतरत्र अन्यता बाहेरील बाजारपेठेत विक्रीस आणावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. तसेच कांदा उत्पादकांना किमान ८०० ते १००० रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी होत आहे.

Edited byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 22 Sep 2022, 11:11 am
नाशिक : कांद्याचा प्रतिकिलो उत्पादन खर्च किमान २२ ते २५ रुपयांच्या पुढे जात असताना दिवसेंदिवस कांद्याच्या भावात सातत्यपूर्ण घसरण होत आहे. परिणामी, कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक टिकून असली तरीदेखील प्रतक्विंटल किमान ५००, कमाल ८०० ते हजार रुपये भाव मिळत असल्याने उत्पादन खर्च निघत नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम onion2.
कांदा दरात घसरण


गतवर्षीची कांद्याची उलाढाल पाहता यंदा जिल्ह्यात उन्हाळ कांद्याच्या लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच कांदा उत्पादकांच्या वाट्याला संघर्ष आला आहे. भाव स्थिरीकरण योजनेतंर्गत नाफेडने यंदा कांदा खरेदीचे उद्दीष्ट तब्बल ५० हजार मेट्रीक टनांनी वाढविले आहे. मात्र प्रत्यक्षात नाफेडकडून होणारी खरेदीदेखील अपारदर्शक कार्यपद्धतीमुळे वादात सापडली. आता सलग तीन महिन्यांपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे भविष्यात भाव मिळण्याच्या अपेक्षेने चाळींमध्ये साठविलेला कांदाही या हवामानाला बळी पडत आहे. कांदा बाजारात विक्रीसाठी आणावा तर उत्पादन अन् वाहतूक खर्चदेखील निघत नाही अन् चाळीत साठवून भाव वाढण्याची वाट बघावी तर निसर्ग साथ देत नाही. त्यामुळे उत्पादकांची ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी अवस्था झाली आहे.

नाफेडने यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांकडून घेतलेला अडीच लाख मेट्रीक टन कांदा स्थानिक बाजारपेठेत न आणता देशांतर्गत इतरत्र अन्यता बाहेरील बाजारपेठेत विक्रीस आणावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. तसेच कांदा उत्पादकांना किमान ८०० ते १००० रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी होत आहे.

सरासरी अकराशेंचा भाव

लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी ८७४५ क्विंटल कांद्याची आवक झाली. उन्हाळ कांद्यास किमान ४०० तर सरासरी ११०० रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला.

महत्वाचे लेख