अ‍ॅपशहर

सोयाबीनचे दर सहा हजारपार

वर्षभरात खाद्यतेलाचे दर दुप्पट झाले. देशांतर्गत व परदेशात कच्च्या मालाचे उत्पादन कमी झाल्याने तसेच आयात शुल्क वाढवल्याचा परिणाम दरवाढीवर झाला. सध्या सोयाबीनचे दर कडाडले आहेत.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 5 Apr 2021, 12:06 pm
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम सोयाबीनचे दर सहा हजारपार


वर्षभरात खाद्यतेलाचे दर दुप्पट झाले. देशांतर्गत व परदेशात कच्च्या मालाचे उत्पादन कमी झाल्याने तसेच आयात शुल्क वाढवल्याचा परिणाम दरवाढीवर झाला. सध्या सोयाबीनचे दर कडाडले आहेत. प्रतिक्विंटल दर सहा हजारच्या वर गेले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होत आहे.

गेल्या महिन्यात सोयाबीनचे प्रतिक्विंटल दर साडेपाच हजार रुपयांपर्यंत उच्चांकी पातळीवर पोहोचले होते. या दरात आणखी वाढ झाली असून, आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहे. मागणी वाढल्याने सोयाबीनला प्रतिक्विंटल ६०१५ रुपये दर मिळाला. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचा फायदा झाला आहे. देशात सर्वाधिक सोयाबीन महाराष्ट्रात पिकवले जाते. पूर्वी मध्य प्रदेशात सर्वाधिक उत्पादन घेतले जात होते. महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन राज्यांत सोयाबीनचे ८० ते ८५ टक्के उत्पादन घेतले जाते. एकूण सरासरी उत्पादन संपूर्ण भारतात ९० ते १०० लाख टन होते. त्यात प्रामुख्याने महाराष्ट्र ४५ लाख टन, मध्य प्रदेश ४० लाख टन, राजस्थान ५ लाख टन व गुजरातमध्ये २ लाख टन उत्पादन घेतले जाते.

मोहरीचे तेलही कडाडणार

देशात यंदा मोहरीची भरघोस उत्पादन होण्याची शक्यता असतानाच दुसरीकडे दर मात्र वाढतच आहेत. मोहरीला प्रतिक्विंटल सरासरी ५६०० रुपये दर मिळत आहे. हमीभावापेक्षा एक हजार रुपये जादा दर मिळतो आहे. गेल्या आठवड्यात मोहरीला ६७०० रुपये कमाल दर मिळाला होता. मोहरीचे तेल प्रतिकिलो १५० ते १६० रुपये दराने विक्री होत आहे. लग्नसराईमुळे वाढती मागणी लक्षात घेता दर २०० प्रतिकिलोपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात मोहरीच्या तेलाला सर्वाधिक मागणी आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज