अ‍ॅपशहर

रेनकोट नमुने तपासणी संशयास्पद?

नाशिक : आदिवासी विकास विभागातील आश्रमशाळांना अव्वाच्या सव्वा दरात पुरवठा करण्यात आलेल्या रेनकोट लॅबमधील नमुने तपासणीही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

विनोद पाटील | Maharashtra Times 15 Jul 2017, 4:00 am
औषधे तपासण्याच्या कंपनीत रेनकोटची गुणवत्ता तपासली,
महाराष्ट्र टाइम्स.कॉम raincoat sample test suspected
रेनकोट नमुने तपासणी संशयास्पद?


नाशिक : आदिवासी विकास विभागातील आश्रमशाळांना अव्वाच्या सव्वा दरात पुरवठा करण्यात आलेल्या रेनकोट लॅबमधील नमुने तपासणीही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ज्या लॅबमधून रेनकोटचे नमुने तपासण्यात आले, ती लॅब ही फार्मास्युटीकल प्रॉडक्ट तपासणीसाठी आहे. त्यामुळे या रेनकोटची गुणवत्ताही संशयास्पद असून, त्यांचीही पुन्हा नव्याने तपासणी करण्याची आवश्यकता आहे. रेनकोट तपासणी फॉर्मास्युटीकल लॅबमधून कशी होऊ शकते, असा प्रश्न तक्रारदारांनी उपस्थित केला आहे.

आदिवासी विभागात कोणत्याही वस्तू अथवा साहित्याचा पुरवठा करायचा असेल, तर प्रथम निविदा प्रक्रियेतून जावे लागते. निविदा प्रक्रियेत पात्र ठरलेल्या कंपन्यांना आपल्या वस्तू व साहित्य हे सरकारी वा निमसरकारी लॅबमधून तपासणी करून घ्यावे लागते. सरकारने सूचविलेल्या लॅबमधून या वस्तूंची निविदेत दिलेल्या अटींप्रमाणे तपासणी करून घेतली जाते. परंतु, या तपासण्या लॅबही आता संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. ठेकेदार आपले नमुने पास व्हावेत, यासाठी लॅबही मॅनेज करीत असल्याचे रेनकोट प्रकरणावरून स्पष्ट होत आहे. नाशिक विभागात पुरवठा करण्यात आलेल्या रेनकोटची तपासणी ही गोरेगाव येथील पॅरालॅब प्रा. लिमिटेड येथून करण्यात आली आहे. परंतु, सदर लॅबमध्ये फार्मास्युटीकल, फुड्स, पेस्टीसाईड, कॉस्मेटीक, केमिकल्स या उत्पादनांची तपासणी केली जाते.

रेनकोट नमुने तपासणीचा या लॅबशी कोणताही संबंध नाही. परंतु, विभागातील ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी संगनमत करून या लॅबमधून आपले नमुने पास करून आणले आहेत. त्यामुळे एकूणच या रेनकोटची गुणवत्ताही संशयास्पद असल्याने सर्वच मामला गोलमाल असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे नमुने तपासणी ही विभागामार्फतच केली जाते. सर्व प्रकल्प कार्यालयांनी नमुने तपासणीसाठी एकच लॅब निवडल्यानेही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे रेनकोटची खरेदी ही ठेकेदारांना समोर ठेवूनच केल्याचे या सगळ्या प्रकारावरून दिसून येत आहे. रेनकोटची खरेदी आणि नमुने तपासणी प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली जात आहे.

लॅबचे गोलमाल उत्तर

संबंधित लॅबच्या संचालकांशी संपर्क साधला असता, त्यांनी गोलमाल उत्तरे दिली. कंपनीचे संचालक सेहूल मेहता यांनी सध्या आमच्याकडे तांत्रिक व्यक्ती उपलब्ध नसल्याने तपासणी बंद असल्याचे सांगितले. ती तपासणी कधीपासून बंद आहे, यावर स्पष्ट उत्तर देणे त्यांनी टाळले. संबंधित लॅबचा संगणक बघून तारीख सांगतो, असे सांगून त्यांनी वेळ मारून नेली. रेनकोटची तपासणी केली जाते काय अशी विचारणा केल्यावर नंतर फोन करतो असे सांगून त्यांनी बोलणे टाळले. त्यामुळे एकूणच या तपासणीवर संशय बळावला आहे.

रेनेकोटची खरेदी आणि नमुने तपासणी ही एकूण सर्व प्रक्रियाच संशयास्पद आहे. ठेकेदार आणि अधिकारी हे मिळून विभागाची लूट करीत असून, या सर्व प्रकाराची स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे. दोषींवर आदिवासी विकास मंत्र्यांनी कठोर कारवाई केली पाहिजे.

- रवींद्र तळपे, माहिती अधिकार कार्यकर्ता, पुणे
लेखकाबद्दल
विनोद पाटील
‌‌विनोद पाटील हे महाराष्ट्र टाइम्स,नाशिक आवृत्तीत विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारीतेत त्यांचा २३ वर्षाचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक मिडीयात दहा वर्ष कामाचा अनुभव आहे. सध्या महाराष्ट्र टाइम्समध्ये राजकीय, महापालिका, शहरविकास व पायाभुत सुविधा, आदिवासी, सहकार या विषयावर लिखाण करतात.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज