म. टा. प्रतिनिधी, नाशिक
ऐतिहासिक कथा जाणून घेताना किंवा अभ्यासताना तेव्हाची नाणी, शस्त्रे आणि चलनवलनाची पद्धत याबाबत सामान्यांना कायम उत्सुकता असते. देश-विदेशांतील अनेक दुर्मिळ नाणी, शस्त्रे आणि टपाल तिकिटांची माहिती आणि महत्त्वाचा उलगडा जानेवारी महिन्यात होणार असून, त्याद्वारे इतिहासातल्या दुर्मिळ खुणा ज्ञात करून घेण्याची संधी नाशिककरांना मिळणार आहे. त्यासाठी १० ते १२ जानेवारीदरम्यान 'रेअर फेअर २०२०' हे अनोखे प्रदर्शन होणार आहे.
कलेक्टर्स सोसायटी ऑफ न्यूमिसमॅटिक अँड रेअर आयटेम्स संस्थेतर्फे जुना गंगापूर नाका येथील इंद्रप्रस्थ हॉलमध्ये सकाळी १० ते सायंकाळी ८ या वेळेत हे प्रदर्शन होणार आहे. यंदा प्रदर्शनाचे हे सहावे वर्ष असून, ते सर्वांसाठी खुले आहे. पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील उपस्थित राहतील. प्रदर्शनात नाशिकमधील १५ संग्राहकांसह संस्थेच्या ३० पेक्षा अधिक संग्राहकांचा समावेश आहे. प्रदर्शनात सुमारे हजार वर्षांपूर्वीच्या सोन्या-चांदीची देश-विदेशातील नाणी पाहण्याची संधी नाशिककरांना मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे सुवर्णहोण हे चलक प्रदर्शनात असेल. प्रदर्शनात चित्रकारांच्या 'मिसळ कट्टा' ग्रुपतर्फे काढण्यात आलेली चित्रे मांडण्यात येणार आहेत. यासोबतच नवरचना माध्यमिक विद्यालयातर्फे आतापर्यंत ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेल्या मान्यवरांच्या माहितीचे फलक प्रदर्शनात लावण्यात येतील.
दरम्यान, ११ जानेवारी रोजी सकाळी ११ ते ४, सायंकाळी ५ ते रात्री ८ आणि १२ जानेवारी सकाळी ११ ते २ या वेळेत मुंबईतल्या नामांकित ऑक्शन कंपन्यांद्वारे दुर्मिळ नाणी आणि नोटांचा लिलाव होणार आहे. संस्थेचे अध्यक्ष मिलिंद पगार, उपाध्यक्ष अॅड. राजेश जुन्नरे, सचिव कपिल पाठक आदींनी ही माहिती दिली.
\Bखरेदीची संधी\B
प्रदर्शनात देशातील सुमारे चाळीस व्यापाऱ्यांचे खरेदी-विक्री स्टॉल असतील. दुर्मिळ नाणी, नोटा, अॅँटिक वस्तू, संग्रहाशी निगडित साहित्य खरेदी करण्याची संधी नाशिककरांना मिळेल. प्रदर्शनात शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नाणी, नोटा, टपाल तिकिटांच्या भेटवस्तू देण्यात येणार आहेत.
\B'जीवनगौरव'ने सन्मान\B
न्यूमिसमॅटिक व इतिहास विषयातील संशोधनाबद्दल गॅझेटरीय विभागाचे संचालक डॉ. दिलीप बलसेकर, नाणेशास्त्र विषयातील लेखन-संशोधनाबद्दल पुरातत्त्व विभागाचे माजी सहाय्यक संचालक शंकर साठे आणि सोलापूरचे प्रसिद्ध संग्राहक व लेखक किशोर चांडक यांना संस्थेतर्फे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. 'रेअर फेअर २०२०' या स्मरणिकेचे प्रकाशनही या वेळी होणार असून, डॉ. दानिश मोईन यांच्या 'इस्लामिक कॅलिग्राफी ऑन मिडेव्हल इंडियन कॉइन्स' या पुस्तकासह संग्राहक आशुतोष पाटील यांचे संग्रहविषयक पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.