अ‍ॅपशहर

रेल्वे स्टेशन आवारात ओला, उबेरला रेड कार्पेट

ओला आणि उबेरसारख्या टॅक्सीसाठी रेल्वेच्या आवारात पार्किंगला जागा देण्याचे सरकारचे धोरण आहे. त्यानुसार नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या आवारात ओला आणि उबेरसारख्या खासगी टॅक्सी सेवेला अधिकृत परवानगी मिळण्याची चिन्हे आहेत.

Maharashtra Times 22 Dec 2017, 4:00 am
डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड
महाराष्ट्र टाइम्स.कॉम red carpet for ola uber at railway station
रेल्वे स्टेशन आवारात ओला, उबेरला रेड कार्पेट


ओला आणि उबेरसारख्या टॅक्सीसाठी रेल्वेच्या आवारात पार्किंगला जागा देण्याचे सरकारचे धोरण आहे. त्यानुसार नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या आवारात ओला आणि उबेरसारख्या खासगी टॅक्सी सेवेला अधिकृत परवानगी मिळण्याची चिन्हे आहेत. भुसावळ रेल्वे वाणिज्य विभागाने याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

नाशिकरोड रेल्वे स्थानकातील मुख्य वाणिज्य निरीक्षक आर. एस. गोसावी यांनी सरकारी धोरणानुसार ही कार्यवाही होत असल्याची माहिती ‘मटा’ला दिली. नाशिकरोड रेल्वे स्टेशन रिक्षाचालक-मालक युनियनचे अध्यक्ष किशोर खडताळे आणि टॅक्सीचालक संघटनेचे पप्पू शेख यांनी ओलासारख्या टॅक्सीसेवेला तीव्र विरोध दर्शविला आहे. ओला, उबेर टॅक्सीचालक व रिक्षाचालक यांच्यात अनेकदा नाशिकरोड स्थानकात हाणामारीचे प्रसंग उद््भवले होते. त्यामुळे प्रस्तावित पार्किंगमुळे नवा वाद उद््भवण्याची चिन्हे आहेत.

--

अधिकाऱ्यांकडून पाहणी

पार्किंगच्या टेंडरची रक्कम १ लाख ९१ हजार ८२५ रुपये असून, बयाणा रक्कम दहा हजार रुपये आहे. २९ डिसेंबरपर्यंत टेंडर जमा करायचे आहे. तीन महिन्याच्या काळासाठी हा करार असेल. भुसावळ आणि नाशिकरोड रेल्वे स्टेशनमधील वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी पार्किंगच्या जागेची पंधरा दिवसांपूर्वी पाहणी केली. मुख्य प्रवेशद्वारासमोर पहिल्या रांगेत ओला व उबेरसारख्या टॅक्सींना जागा देण्याचे नियोजन आहे. सध्या येथे रिक्षा उभ्या राहतात.

---

गोंधळाची स्थिती

नाशिकरोड स्थानकाच्या एक किलोमीटर परिसरात ओला, उबेरसारख्या टॅक्सी उभ्या करण्यास प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी, तसेच पोलिसांनीही परवानगी दिली नसल्याचे रिक्षा संघटनेचे अध्यक्ष किशोर खडताळे यांनी सांगितले. त्यामुळे रेल्वे कशी काय परवानगी देऊ शकते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. रेल्वे अधिकाऱ्यांच्याही निर्दशनास रिक्षाचालक संघटनेने हा मुद्दा आणून दिला आहे.

--

आंदोलनाचा इशारा

नाशिकरोडला सुमारे तीनशे रिक्षा व ४५ टॅक्सी आहेत. गेल्या ३५-४० वर्षांपासून ते येथे व्यवसाय करीत आहेत. स्पर्धेमुळे रिक्षाचालकांचा व्यवसाय होत नाही. ओला व उबेरसारखी टॅक्सीसेवा सुरू झाल्यास आपला संसार उघड्यावर येईल, अशी भीती रिक्षाचालकांना वाटते. उबेर आणि ओलासारख्या कंपन्यांना रेल्वे स्थानक भागात भाडेतत्त्वावर पार्किंगसाठी जागा दिली जाणार आहे, असे सांगून खडताळे म्हणाले, की आम्हीदेखील भाडे भरण्यास तयार आहोत. पण, रेल्वे परवानगी देत नाही. आम्ही विमा व कर भरतो, बॅच व परमिटही आहे. मग हा अन्याय का? यामागे मोठे आर्थिक कारण आहे. या टॅक्सींना पार्किंगसाठी फ्लॅटफॉर्म क्रमांक चारवर मुबलक जागा आहे. तेथे आमचा विरोध नाही. रेल्वेने ओला, उबेरला परवानगी दिल्यास रिक्षाचालक रेल्वेखाली आत्महत्या करतील व त्याला रेल्वे प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा संघटनेचे उपाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, महंमद शेख, सचिन सोनवणे, रमेश दाभाडे, अनिल शिंदे, गोविंद साळुंके, अरुण गोसावी, मोहिन हिरे, अरुण गोसावी, टॅक्सी संघटनेचे पप्पू शेख, अल्ताफ सय्यद, शेख अलीम विठ्ठल भडांगे, मोहसीन पटेल आदींनी दिला आहे.

--

रेल्वेने प्रवास करणारा उच्चशिक्षितवर्ग मोठा आहे. त्याला ओला, उबेरसारखी टॅक्सीसेवा नाशिकरोड स्थानकात हवी आहे. त्याला अनुसरून रेल्वेने पावले उचलली असतील, तर ते योग्यच आहे. रिक्षाचालकांना फटका बसणार नाही, अशी आशा वाटते.

-प्रा. किरण रकिबे, प्रवासी

--

रेल्वे स्थानकात आमच्या पोटावर पाय देऊन ओला व उबेरसारख्या टॅक्सीसेवेला परवानगी दिली जाणार असेल, तर आमचा त्याला तीव्र विरोध राहील. या टॅक्सीला सिन्नर फाटा रेल्वे प्रवेशद्वारासमोर पार्किंग देण्यास हरकत नाही.

-किशोर खडताळे, अध्यक्ष, रिक्षाचालक संघटना

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज