अ‍ॅपशहर

मेंढपाळाच्या वेठबिगारीतून अकरावर्षीय बालिकेची सुटका; मेंढपाळाचा शोध सुरु

ती सारखी ‘मला माझ्या घरी नेवून सोडा’ म्हणून विनवणी करीत असे. मात्र, रमेश ढेपले आणि त्याचे कुटुंबीय तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत होते. दरम्यान, श्रमजीवी संघटनेने बाल वेठबिगारीची काही प्रकरणे उजेडात आणल्याने ढेपले याचे धाबे दणाणले.

Edited byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 2 Oct 2022, 12:15 pm
त्र्यंबकेश्वर : श्रमजिवी संघटनेने सिन्नर तालुक्यात मेंढपाळाकडे गेल्या पाच वर्षांपासून कष्टाची कामे करणाऱ्या अकरा वर्षीय बालिकेची सुटका करीत तिला तिच्या घरी आणून सोडले. संघटनेच्या मदतीने मुलीच्या आई-वडिलांनी त्र्यंबक पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, रमेश सूर्यभान ढेपले (रा. हिवरगाव पंचाळे, ता. सिन्नर) याच्याविरुद्ध वेठबिगार उच्चाटन कायदा आणि बालन्याय हक्क कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. बालिकेला सोबत घेऊन मेंढपाळाचा शोध घेण्यासाठी पोलिस रवाना झाले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम child crying
मेंढपाळाच्या वेठबिगारीतून अकरावर्षीय बालिकेची सुटका


मुलीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार...

आई-वडील आणि चार भावंडे यांच्यासोबत शिरसगाव येथे सदर बालिका राहत होती. पाच वर्षांपूर्वी ती पहिलीत शिकत असताना संशयित ढेपले तेथे आला. त्याने या मुलीला मेंढ्या वळण्याचे काम देतो असे सांगून त्या बदल्यात आईवडिलांना सहा हजार रुपये रोख दिले व तिला बरोबर घेऊन गेला. तेथे या बालिकेला दररोज सकाळी चहानंतर मेंढ्या बसलेले वाडे झाडायला सांगण्यात येत असे. नंतर तिला जेवण देत असत. सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शेळ्या-मेंढ्या घेऊन त्या चारण्यासाठी रानात जावे लागत असे. शंभर ते दीडशे मेंढ्या घेऊन सायंकाळपर्यंत रानोमाळ फिरावे लागत असे. मुलीला दररोज पोटभर जेवण दिले जात नसे. भांडी घासणे, शेळ्या-मेंढ्यांना चारा-पाणी करणे, स्वच्छता करणे यांसारख्या कामांमुळे बालिका कंटाळली होती. ती सारखी ‘मला माझ्या घरी नेवून सोडा’ म्हणून विनवणी करीत असे. मात्र, रमेश ढेपले आणि त्याचे कुटुंबीय तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत होते. दरम्यान, श्रमजीवी संघटनेने बाल वेठबिगारीची काही प्रकरणे उजेडात आणल्याने ढेपले याचे धाबे दणाणले. दहा दिवसांपूर्वी त्याने अचानक बालिकेला तिच्या घरी आणून सोडले. घरी आल्यानंतर बालिकेने तिच्या आईवडिलांना पाच वर्षांत ढेपले याने तिला दिलेल्या त्रासाची माहिती दिली. त्यानंतर श्रमजीवी संघटनेचे तालुका अध्यक्ष भगवान डोखे, सुरेश पुंजारे, सुंदराबाई वाघ यांच्या मदतीने आई-वडिलांनी त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार दीपक गिरासे यांच्याकडे येऊन घडलेला प्रकार कथन केला. त्यानंतर मुलीने स्वत:ही आपबिती सांगितली. त्यानंतर त्र्यंबक पोलिस ठाण्यात वेठबिगार उच्चाटन कायदा आणि बालन्याय हक्क कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

- सहा वर्षे वयाच्या बालिकेला मेंढ्या चारण्यासाठी सहा हजारांत नेले बरोबर

- शाळेत जात असतानाही तिला शिक्षणापासून वंचित ठेवले.

- कातकरी समाजाच्या कुटुंबाच्या अज्ञान, गरिबीचा घेतला फायदा

- मुलीला पोटभर अन्नही दिले जात नसे

- मुलीने विनवणी करूनही पाच वर्षे घरी पाठवले नाही

- सकाळपासून रात्रीपर्यंत काम करण्यास भाग पाडले

- झाडलोट, स्वच्छता, भांडी घासणे, मेंढ्या चारणे आदी कामे करावी लागली

- इतर प्रकरणे उघडकीस आल्यानंतर कारवाईच्या भीतीने आणून सोडले

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज