म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरात मोठ्या प्रमाणावर सीसीटीव्ही बसविण्याचे काम हाती घेण्यात आले असून, याद्वारे बेशिस्त वाहनांवर थेट लक्ष ठेवण्यात येणार आहे. हे काम पूर्ण होण्यास काही कालावधी असला तरी भरधाव वाहने हाकणाऱ्या चालकांना रविवारपासूनच सावधानता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. मद्यपी चालक, ओव्हरस्पीड वाहनांवर लक्ष ठेवून पुरावेच समोर ठेवणारी दोन आधुनिक इंटरसेप्टर वाहने वाहतूक शाखेकडे उपलब्ध झाली असून, रविवारपासून (दि. २४) याद्वारे थेट कारवाई करण्यात येणार आहे.
मद्यपी वाहनचालक आणि ओव्हरस्पीड या प्रमुख दोन कारणांमुळे रस्ते अपघात मोठ्या प्रमाणावर होतात. शहरातच दरवर्षी शेकडो वाहनचालकांचा बळी जातो. या पार्श्वभूमीवर महापालिका हद्द, तसेच राष्ट्रीय व राज्य महामार्गावर बेशिस्त वाहनचालकांवर पुराव्यानिशी कारवाई करण्यासाठी सरकारने आधुनिक इंटरसेप्टर वाहने उपलब्ध करून दिली आहेत. त्यातील दोन वाहने शहर पोलिसांच्या वाहतूक शाखेला उपलब्ध झाली आहेत. ओव्हर स्पीड मोजण्यासाठी लेसर गन, ब्रिथ अॅनालयाझर, काचेची पारदर्शकता मोजण्यासाठी वापरण्यात येणारे टिंट मशिन या वाहनामध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. या वाहनांचा वापर कसा करावा याबाबत महामार्ग पोलिसांसह शहर वाहतूक शाखेतील पोलिसांना ११ नोव्हेंबर रोजी झालेल्या एका कार्यक्रमात प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण पिंपळगाव बसंवत येथील महामार्ग सहायता केंद्रात देण्यात आले होते. या वाहनांमध्ये आधुनिक यंत्रणा उपलब्ध असून, त्याचे प्रशिक्षण देण्याचे काम दिल्ली येथील एक्सपिरिओ टेक प्रा. लि. या कंपनीने दिले आहे.
स्पीड लेसरगन ठरणार परिणामकारक
स्पीड लेसरगन कॅमेऱ्याचा वापर ओव्हर स्पीड टिपण्यासाठी होतो, तर टिंट मीटर्स हे काचेची पारदर्शकता मोजते. मद्यपी वाहनचालकांना रोखण्यासाठी ब्रिथ अॅनालायझरचा वापर होतो. या साधनांमुळे हेल्मेट न वापरता दुचाकी चालविणाऱ्या दुचाकीस्वारांसह सीटबेल्टचा वापर न करणाऱ्या कारचालकांवरसुद्धा कारवाई करणे शक्य होणार आहे. रविवारपासूनच या वाहनाचा वापर करण्यात येणार असून, वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.