आदितालतर्फे शनिवारी तबला सहवादन
कॉलेज क्लब रिपोर्टर, नाशिक
आदिताल तबला अकादमीचा सतरावा गुरुपौर्णिमा सोहळा शनिवार (३१ ऑगस्ट) हॉटेल करी लिव्हज, जेहान सर्कल येथे सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही आकर्षण असेल ते अकादमीच्या तबला सहवादनाचे. यंदा साठहून अधिक विद्यार्थ्यांचे तबला सहवादन होणार आहे. यात वय वर्ष ५ ते ६५ या वयोगटातील कलावंतांचा सहभाग असणार आहे.
उस्ताद अहमदजान थिरकवाँ यांच्या शैलीचा अभ्यास व त्यांच्या शैली नुसार तबला सहवादनात विविध ताल आणि त्यांची अनुभुती रसिकांना घेता येणार आहे. तबला सहवादनात उस्ताद अहमदजान थिरकवाँ यांच्या कायदे, रेले, तुकडे, चक्रधार, गतपरण या शैलींची अनुभुती रसिकांना घेता येणार आहे. या सोहळ्यास ज्येष्ठ तबला वादक पं. कमलाकर वारे आणि नाशिकमधील ज्येष्ठ कलाकार उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमास रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आदिताल अकादमीतर्फे करण्यात आले आहे.