अ‍ॅपशहर

भिडेंच्या अटकेवरून तणाव

म टा खास प्रतिनिधी, नाशिकशिवप्रतिष्ठान संस्थेचे संभाजी भिडे यांची सभा रविवारी रामकुंड परिसरात आयोजित करण्यात आली होती...

Maharashtra Times 11 Jun 2018, 4:00 am

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शिवप्रतिष्ठान संस्थेचे संभाजी भिडे यांची सभा रविवारी रामकुंड परिसरात आयोजित करण्यात आली होती. कोरेगाव भीमा दंगल प्रकरणात भिडे यांचे नाव असल्याने या सभेस विरोध होण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले होते. दुपारी चारच्या सुमारास शालिमार चौकातील आंबडेकर पुतळ्याजवळ २५० ते ३०० कार्यकर्ते जमा झाले. भिडेंना अटक करण्यासह सभा रोखण्याची मागणी आंदोलकांनी करीत रामकुंडाच्या दिशेने कूच केली. त्यामुळे पोलिसांनी नेहरू गार्डन, शालिमार, रविवार कारंजा, सीबीएस, अशोकस्तंभ अशा विविध ठिकाणी बंदोबस्तात वाढ केली. तसेच, रामकुंडाच्या दिशेने जाणाऱ्या आंदोलकांना रोखले.

पोलिसांनी समजूत घातल्यानंतर आंदोलक पुन्हा आंबेडकर पुतळ्याजवळ जमा झाले. तेथून काही कार्यकर्ते सीबीएस चौकात आले. तिथे त्यांनी रस्ता रोको केला. याच दरम्यान जिल्हा कोर्टासमोर एका समाजकंटकाने म्हसरूळला निघालेल्या सिटीबसवर चालकाच्या दिशेने दगड फेकला. यानंतर पेट्रोल असलेली बॉटल फेकून आग लावली. सुदैवाने पेट्रोल जमिनीवरच सांडले. यामुळे अनर्थ टळला. या वेळी प्रवाशांसह परिसरातील नागरिकांची एकच धावपळ उडाली. विविध शाळा या आठवड्यात सुरू होत असल्याने खरेदीसाठी रविवारी नागरिकांची मोठी गर्दी या भागात झाली होती. दुसरीकडे अधिक महिन्यातील एकादशीचा मुहूर्त साधून रामकुंडाकडे येणाऱ्या भाविकांचे यामुळे हाल झाले. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, लक्ष्मीकांत पाटील, श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह सहाय्यक पोलिस आयुक्त, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, शीघ्र कृती दलाचे जवान, दंगल नियंत्रण पथक असा पोलिस बंदोबस्त तैनात होता. पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली तरी रात्री उशिरापर्यंत तणाव कायम होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज