अ‍ॅपशहर

रामसेतूवर वाट बिकट

पंचवटी आणि नाशिक शहराचा बाजारपेठेचा भाग जोडण्यासाठी बांधण्यात आलेला सर्वांत कमी उंचीचा पूल म्हणून रामसेतूची ओळख आहे. मात्र, फक्त पादचाऱ्यांसाठीच असलेल्या या पुलावर सध्या किरकोळ विक्रेत्यांच्या दुकानांची गर्दी वाढली आहे.

Maharashtra Times 23 Jul 2017, 4:00 am
म. टा. वृत्तसेवा, पंचवटी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम unauthorised shpos over ramsetu
रामसेतूवर वाट बिकट


पंचवटी आणि नाशिक शहराचा बाजारपेठेचा भाग जोडण्यासाठी बांधण्यात आलेला सर्वांत कमी उंचीचा पूल म्हणून रामसेतूची ओळख आहे. या पुलावरून वाहनांना बंदी करण्यात आली आहे. मात्र, फक्त पादचाऱ्यांसाठीच असलेल्या या पुलावर सध्या किरकोळ विक्रेत्यांच्या दुकानांची गर्दी वाढली आहे. हा पूल त्यांच्यासाठी जणू हक्काची जागाच बनला आहे.

वाहनांसाठी हा पूल बंद करण्याकरिता दोन्ही बाजूंना उंचवटे बांधण्यात आलेले आहेत. असे असले, तरी येथून मोठी कसरत करीत दुचाकी वाहने नेण्याचा काही जण प्रयत्न करताना दिसतात. पूरस्थितीच्या वेळी सर्वांत अगोदर या पुलावरून पाणी वाहू लागते. अचानक पाणी वाढल्यास येथे धोका निर्माण होऊ शकतो. कापड बाजार, भांडी बाजार आणि सराफ बाजाराला जोडणारा हा पूल प्रामुख्याने पादचाऱ्यांच्या उपयोगासाठी आहे. पंचवटीतून या बाजारपेठेत किंवा या बाजारपेठेतून पंचवटीकडे जाण्यासाठी या पुलाचा वापर होत असतो. वाहने जाण्यासाठी बाजारपेठेकडून दक्षिणेला उतार असलेल्या भागातून नदीपात्राच्या फरशीवरून पंचवटीकडे वाहने नेता येतात.

पुलावर वाहनांची वर्दळच नसल्यामुळे येथील रुंद पुलाच्या दोन्ही बाजूंचा उपयोग विविध वस्तू विक्रेत्यांनी करून घेतला आहे. त्यात हातगाड्या तर थेट पुलाच्या मध्यभागावरच थांबविल्या जातात. ग्राहक आणि विक्रेत्यांच्या गर्दीने हा पूल नेहमीच भरून गेलेला दिसतो. पुढे बाजारपेठेतही असाच प्रकार बघायला मिळतो. बाजारात दुकानासमोर थेट रस्त्यावरच काही दुकानांचा विक्रीचा माल ठेवण्यात येतो. जवळच दुकानदारांची वाहने पार्क केली जातात. परिणामी पादचाऱ्यांना या भागातून जाताना अनेक अडथळे पार करावे लागत आहेत. पादचाऱ्यांना येथून सहज जाता येईल, याचा विचार करून दुकानांची मांडणी करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज