अ‍ॅपशहर

नाशिकचा भाजीपाला दुबई, सिंगापूरला

गेल्या वर्षीपासून शेळ्या मेंढ्यांची आखाती देशांमध्ये निर्यात केल्यानंतर आता नाशिकचा भाजीपालाही हवाईमार्गे सिंगापूर, दुबईला पाठवला जात आहे.

Maharashtra Times 26 Jul 2017, 3:39 am
रामनाथ माळोदे, पंचवटी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम vegetable export to dubai singapore
नाशिकचा भाजीपाला दुबई, सिंगापूरला


गेल्या वर्षीपासून शेळ्या मेंढ्यांची आखाती देशांमध्ये निर्यात केल्यानंतर आता नाशिकचा भाजीपालाही हवाईमार्गे सिंगापूर, दुबईला पाठवला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भाजीपाल्याची बाजारपेठ विस्तारली असून, शेतकऱ्यांच्या मालालाही चांगला भाव मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

आधुनिक सिंचन पद्धतीमुळे नाशिक जिल्ह्यातील ओलिताखाली येणाऱ्या क्षेत्राचे प्रमाण वाढत आहे. द्राक्ष, डाळिंब, कांदा ऊस यांसारखी नगदी पिके होत असलेल्या नाशिक जिल्ह्यात भाजीपाल्याचीही लागवड मोठ्या प्रमाणात होते. मुंबई आणि गुजरातला भाजीपाला पुरविणारी बाजारपेठ म्हणून नाशिक बाजार समितीची ओळख आहे. या बाजार समितीतून आता हवाई मार्गाने थेट सिंगापूरला आणि दुबईला भाजीपाला पाठविण्यात येऊ लागला आहे.

नाशिक बाजार समितीतील संचालक जगदीश अपसुंदे यांनी एक महिन्यापासून हा भाजीपाला विमानाने दुबई आणि सिंगापूरला पाठविण्यास सुरुवात केली आहे. बाजारात येणाऱ् भाजीपाल्याची खरेदी करून त्या मालाची चांगली प्रतवारी करून कोरोगेटेड बॉक्समध्ये त्याची पॅकिंग करण्यात येते. हा पॅक केलेला शेतमाल मुंबई विमानतळावर पाठविण्यात येतो. तेथून हा भाजीपाला सिंगापूर आणि दुबईला पाठविण्यात येतो. दुबईला पाठविण्यात येणाऱ्या भाजीपाल्याला प्रतिकिलो ५० रुपये आणि सिंगापूरला पाठविण्यात येणाऱ्या भाजीपाल्याला प्रतिकिलो ४० रुपये असा खर्च येतो. ताजा आणि दर्जेदार भाजीपाला असल्याने त्याला चांगली मागणी आहे. भाजीपाल्याची मागणी आणि विमानातील जागेचे उपलब्धता याचा विचार करून रोज भाजीपाला पाठविण्यात येतो.

या भाज्या होतात निर्यात..

दुबईच्या बाजारात कारले, दुधीभोपळा, छोटी वांगी, काळी गोल वांगी आणि लांब आकाराची वांगी पाठविण्यात येतात. तर सिंगापूरला हिरवी मिरची, लसूण आणि वांगी पाठविण्यात येतात. हिरवी मिरची आणि लसूण यांची पॅकिंग जाळीदार पिशवीमध्ये करण्यात येते. इतर भाजीपाला कोरोगेटेड बॉक्समध्ये पॅक केला जातो. नाशिकहून टेम्पोतून हा भाजीपाला मुंबईच्या विमानतळावर पाठविला जातो. तेथून तो विमानात लोड करून पाठविण्यात येतो.

पावसामुळे सध्या भाजीपाल्याचा दर्जा खालावला आहे. त्यामुळे भाजीपाल्याची प्रतवारी करणे अवघड जात आहे. दुबईपेक्षा सिंगापूरला दर्जेदार मालाची मागणी असल्यामुळे तेथे पाठविण्यात येणाऱ्या भाजीपाल्याची प्रतवारी करताना जास्त काळजी घ्यावी लागते. त्याचप्रमाणे हा माल विमानतळावर वेळेत पोहचविण्याचीही दक्षता घ्यावी लागते.

- जगदीश अपसुंदे, निर्यातदार

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज