अ‍ॅपशहर

बंधने पाळून करा विवाहसोहळे; मंगल कार्यालय संघटना सभासदांना सूचना

वीकेंड लॉकडाउनमध्येही मर्यादित वऱ्हाडींच्या उपस्थितीत विवाह सोहळ्यांना परवानगी देण्यात आल्यामुळे मंगल कार्यालये-लॉन्सचालकांना दिलासा मिळाला आहे.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 14 Jun 2021, 12:07 pm
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम बंधने पाळून विवाहसोहळे; मंगल कार्यालय संघटना सभासदांना सूचना


वीकेंड लॉकडाउनमध्येही मर्यादित वऱ्हाडींच्या उपस्थितीत विवाह सोहळ्यांना परवानगी देण्यात आल्यामुळे मंगल कार्यालये-लॉन्सचालकांना दिलासा मिळाला आहे. पुढील दीड महिन्यातील पाच ते सहा मुहूर्त शनिवारी-रविवारी येत असल्यामुळे मंगल कार्यालयांचे अर्थचक्र फिरणार आहे. करोनाविषयक सर्व नियमांचे तंतोतंत पालून करूनच विवाह सोहळे होणार असल्याचे मंगल कार्यालय चालकांनी सांगितले.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे एप्रिलपासून मंगल कार्यालये, लॉन्स बंद होते. विवाह सोहळ्यांत गर्दी होते आणि त्यातून करोना पसरण्याचा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे विवाह सोहळ्यांना फक्त नोंदणी पद्धतीने पाच-सहा नातेवाइकांच्या उपस्थितीतच परवानगी होती. परंतु, रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे गेल्या आठवड्यापासून ५० वऱ्हाडींच्या उपस्थितीत विवाहसोहळ्यांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, नाशिकमध्ये वीकेंड लॉकडाउन लागू असल्यामुळे शनिवारी-रविवारी विवाह सोहळ्यांनाही बंदी होती. अनेकांना शनिवारी-रविवारी सुटी असते, त्यामुळे नातेवाइकांनाही लग्नाला यायला जमावे म्हणून शनिवारी-रविवारी येणारे मुहूर्त धरण्याकडे कल असतो. परंतु, नेमके हे दोन दिवस विवाहसोहळ्यांवर बंदी होती. पुढील दीड महिन्यात अवघे १२ मुहूर्त असून, त्यातील चार मुहूर्त वीकेंडला येत होते. मंगल कार्यालये, लॉन्सचालकांचा संपूर्ण सीझनच गेला असून, त्यांचे अर्थचक्र फिरण्यासाठी किमान शनिवारी-रविवारी विवाह सोहळ्यांना परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी इतर दिवसांप्रमाणेच सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत ५० नातेवाइकांच्या उपस्थितीत विवाह सोहळ्यांना परवानगी दिली आहे. यामुळे मंगल कार्यालये-लॉन्सचालकांना दिलासा मिळाला आहे. करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी मंगल कार्यालय संघटनेने सभासदांना निर्देश दिले आहेत. येणाऱ्या प्रत्येक वऱ्हाडीचे तापमान घेणे, मास्क नसल्यास तो उपलब्ध करून देणे, विवाह सोहळ्याच्या ठिकाणी सुरक्षित अंतर पाळणे, सॅनिटायजेशन आदींचे काटेकोर पालन करण्यास बजावण्यात आले आहे. शिवाय, लग्न लावताना तसेच जेवणावळीच्या वेळीही सुरक्षित अंतराचे पालन करण्याच्या दृष्टीने बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे.

पूरक व्यवसायांनाही दिलासा

एका विवाह सोहळ्यासाठी सुमारे २५ ते ३० प्रकारचे व्यवसाय अवलंबून असतात. लग्न पत्रिका, बॅनर, फुलवाले, फोटोग्राफर, बँडबाजा, केटरींग, दागिने, कपडे, रांगोळी, मेहंदी, ब्युटी पार्लर्स यांच्यापासून ते अगदी फेटेवाला, घोडेवाला, ऑर्केस्ट्रा, सूत्रसंचालक, मिठाई, भाजीपाला, दूध आदींसह विविध प्रकारच्या सेवाही यावर अवलंबून असतात. या सर्व व्यवसायांनाही काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.


अनेकजण सुटीमुळे शनिवारी-रविवारी विवाह ठेवतात. या दिवशी विवाहांना परवानगी दिल्यामुळे प्रत्येक मंगल कार्यालयाला चार-पाच मुहूर्त सापडणार आहेत. यामुळे आतापर्यंत ठप्प झालेले आमचे अर्थचक्र फिरणार आहे.

-सुनील चोपडा, अध्यक्ष, मंगल कार्यालय व लॉन्स चालक संघटना

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज