अ‍ॅपशहर

झिप झॅप झूम - बालकथा

संवेदनशील गणूअरुण पाटील, नाशिकरविवारचा दिवस होता सुट्टी असल्यामुळे गणू आई बाबांजवळ प्राणिसंग्रहालय पाहण्यासाठी हट्ट करीत होता...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Sep 2019, 4:00 am

संवेदनशील गणू

अरुण पाटील, नाशिक

रविवारचा दिवस होता. सुट्टी असल्यामुळे गणू आई बाबांजवळ प्राणिसंग्रहालय पाहण्यासाठी हट्ट करीत होता. सकाळी आईने न उठवता लवकर उठला प्राथमिक तयारी केली आणि प्राणिसंग्रहालय पाहण्यासाठी तयार झाला. गणू, आई व त्याचे बाबा पाण्याची बाटली आणि दुपारच्या जेवणाचा डबा घेऊन निघाले. गणू आज खूप खुशीत होता. प्राणिसंग्रहालयात पोहोचल्याबरोबर त्यांनी प्रवेशाची तिकिटं घेतली आणि संग्रहालय पाहायला सुरुवात झाली. गणूला जंगली प्राणी ज्याप्रमाणे चित्रात असतात तसेच ते प्रत्यक्षात असतात की नाही ते पाहण्याची ओढ लागलेली होती. सुरुवातीला वेगवेगळ्या आकारांचे वेगवेगळ्या रंगांचे आकर्षक असे देशी आणि विदेशी पक्षी त्यांनी बघितले. पिंजऱ्यातले पक्षी कोणीजवळ आल्यानंतर जोरात पंख फडफड करायचे. गणूने विचार केला आणि त्याच्या आईला म्हणाला, 'आई पक्षी कितीही सुंदर असला तरी तो आकाशातच सुंदर दिसतो. पिंजऱ्यात नाही. म्हणून मला तर असे वाटते की पक्ष्यांची जागा ही आकाशातच योग्य आहे. बघ ना भले मोठे आकाश आणि किती हा छोटा पिंजरा. काही वेळानंतर त्यांचा मोर्चा सर्पलयाकडे वळला. वेगवेगळ्या जातींचे सर्प पाहून गणूला भितीच वाटत होती. अजगर, विषारी नाग, धामण, नागिन यासारखे सर्प होते. परंतु बिचारे एखाद्या गोलाकार चुंबळप्रमाणे एकाच ठिकाणी निश्चलपणे पडून राहिलेले होते.

गणू म्हणाला, 'बाबा हा साप जिवंत आहे की मेला आहे.'

बाबा म्हणाले 'अरे मेलेला कशाला ठेवतील. जिवंतच आहे.'

गणू म्हणाला, 'मग हालचाल का नाही करत.'

आता समजले त्याला मोठ्या बिळात राहायची सवय आहे. म्हणून त्याला छोट्या काचेच्या घरात खूप वेदना होत असतील ना. काही अंतर चालत गेल्यानंतर ते जंगली प्राण्यांच्या संग्रहालयात गेले त्याठिकाणी गणूने काळ्या-पांढऱ्या रंगाचे माकड, पट्टेदार बिबट्या, रानगवे, कोल्हा, अस्वल, जंगलचा राजा सिंह पहिला. सिंह मात्र एकाच ठिकाणी येरझारा घालत होता. जणूकाही आजारीच पडलेला होता. अशक्त दिसत होता. एरवी चित्रात आणि सिनेमात धडधाकट दिसणारा सिंह अगदी नाखुश झालेला होता, थकलेला होता. पर्यटकांकडे त्याचे अजिबात लक्ष नव्हते. नुसता वेड लागल्यासारखं पुढे जायचा मागे यायचा. गणूला काय मज्जा आली नाही.

तो पुन्हा आईला म्हणाला, 'आई हे असलं कसलं प्राणिसंग्रहालय आता सिंह जंगलात शोभून दिसतो किती धीट असतो किती शूर असतो. येथे त्याला तुरुंगवासात वाटत असेल ना आणि म्हणून वनराज सिंह हा जंगलातच शोभून दिसतो प्राणिसंग्रहालया नाही.' गणूची संवेदनशीलता पाहून आई म्हणाली, 'गणू प्राणिसंग्रहालयात जे-जे प्राणी असतात ते सर्व प्राणी आपण प्रत्यक्षात पाहू शकत नाही. मुलांच्या ज्ञानात भर पडावी, त्यांची जिज्ञासा पूर्ण व्हावी या उद्देशाने प्राणीसंग्रहालय असते. खरं तर आपण एवढे हिंस्त्र प्राणी पाहण्यासाठी जंगलात जाऊ शकत नाही. मग नुसतं चित्र आणि सिनेमात पाहण्यापेक्षा प्राणिसंग्रहालयात पाहणे वास्तव असते. या ठिकाणी प्राण्यांची चांगल्या पद्धतीने काळजी घेतली जाते. त्यांना योग्य तो आहार दिला जातो. त्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी वैद्यकीय उपचार केले जातात. अगदी मी तुझी काळजी घेते त्याप्रमाणे.' हे ऐकून गणूचे समाधान झाले आणि अगदी आनंदाने नवीन अनुभव घेत तो आई बाबांसोबत घराकडे निघाला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज