म. टा. प्रतिनिधी, मुंबई
भाजपचे आमदार राम कदम यांनी मुलींविषयी बेताल वक्तव्य करून, समस्त महिलांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला व युवती आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आ. कदम यांच्या पूर्व उपनगरातील आर सिटी मॉलनजीकच्या निवासस्थानी बुधवारी सकाळी आंदोलन केले. राम कदम यांना अटक करण्याच्या मागणीसाठी महिला व युवतींनी जोरदार घोषणा देत सारा भाग दणाणून सोडला. आंदोलक महिलांना पोलिसांनी चिरागनगर पोलिस ठाण्यात आणल्यानंतर आ. राम कदम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आंदोलक सायंकाळपर्यंत पोलिस ठाण्यातच धरणे सत्याग्रह करून बसल्या होत्या.
राम कदम यांनी समस्त महिला वर्गाचा अपमान केला असून, यासाठी त्यांनी तातडीने जाहीर माफी मागावी अशी मागणी मुंबई राष्ट्रवादी महिला आघाडीच्या सुरेखा पेडणेकर यांनी केली. मुलींबद्दल वादग्रस्त विधाने करणाऱ्या राम कदम यांचा आम्ही सर्व महिला जाहीर निषेध करीत आहोत, असे त्यांनी सांगितले. या आंदोलनात आ. विद्या चव्हाण, सुरेखा पेडणेकर, मुंबई युवती अध्यक्षा अदिती नलावडे, मुंबई समन्वयक मनीषा तुपे, जिल्हाध्यक्षा पुष्पा हरियन, डॉ. सुरैना मल्होत्रा, आरती साळवी, बिलकीश शेख, डॉ. रिना मोकल, स्वाती माने यांच्यासह अनेक महिला, युवती सहभागी झाल्या होत्या.
कदम यांनी 'एखादी मुलगी तुम्हाला पसंत असेल, पण ती लग्नाला नकार देत असेल तर मला सांगा. तिला पळवून आणण्यात मी मदत करेन,' अशी मुक्ताफळे दहीहंडीच्या कार्यक्रमात उधळल्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मुंबई राष्ट्रवादीच्या महिला आणि युवती आघाडीने भाजप आमदार राम कदम यांच्या घरासमोर जोरदार घोषणा देऊन, त्यांच्या अटकेची मागणी केली.
काळे फासून चपलांचा मारा
आंदोलकांनी राम कदम यांचा उल्लेख रावण कदम असा करून त्यांच्या फोटोला काळे फासले. तसेच फोटोला चपलांचा मारा करून महिलांनी संताप व्यक्त केला. कदम यांच्याविरोधात गुन्हा दाखल होईपर्यंत निदर्शकांनी पोलिस ठाण्यातच ठिय्या आंदोलन सुरू केले असून, ते सायंकाळी उशिरापर्यंत चालू होते.