अ‍ॅपशहर

पनवेलचा कचराप्रश्न पेटणार

१ ऑक्टोबरपासून पनवेल महापालिका क्षेत्रातील सिडको वसाहतींचा कचरा उचलला जाणार नाही, या भूमिकेवर सिडको ठाम असल्यामुळे येत्या काळात महापालिका विरुद्ध सिडको असा वाद होणार आहे. महापालिकेने नेमलेल्या समितीसदस्यांनी कचरा उचलण्यास नकार दिल्यानंतर विरोधकांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका बुधवारी स्पष्ट केली. सिडकोकडे वसाहतींचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, त्यामुळे कचरा आणि अन्य सेवासुविधांच्या हस्तांतरणाला आमचा विरोध असेल, अशी ठाम भूमिका विरोधकांनी घेतली आहे.

Maharashtra Times 28 Sep 2017, 4:00 am
सिडकोच्या गेटवर ​ कचरा टाकण्याचा विरोधकांचा ‌इशारा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cidco said garbage problem will not collect
पनवेलचा कचराप्रश्न पेटणार


म. टा. वृत्तसेवा, पनवेल

१ ऑक्टोबरपासून पनवेल महापालिका क्षेत्रातील सिडको वसाहतींचा कचरा उचलला जाणार नाही, या भूमिकेवर सिडको ठाम असल्यामुळे येत्या काळात महापालिका विरुद्ध सिडको असा वाद होणार आहे. महापालिकेने नेमलेल्या समितीसदस्यांनी कचरा उचलण्यास नकार दिल्यानंतर विरोधकांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका बुधवारी स्पष्ट केली. सिडकोकडे वसाहतींचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, त्यामुळे कचरा आणि अन्य सेवासुविधांच्या हस्तांतरणाला आमचा विरोध असेल, अशी ठाम भूमिका विरोधकांनी घेतली आहे.

पनवेल महापालिका स्थापन होऊन १ ऑक्टोबरला एक वर्ष पूर्ण होत आहे. महापालिकेत पनवेल तालुक्यातील खारघर, कळंबोली, कामोठे, नावडे, नवीन पनवेल, खांदा कॉलनी या सिडकोच्या वसाहती समाविष्ट झाल्या आहेत. मात्र महापालिकेत समाविष्ट झालेल्या वसाहतीतील कचरा आणि आरोग्य सुविधा १ ऑक्टोबरपासून आम्ही देणार नाही, अशी ताठर भूमिका सिडको प्रशासनाने घेतली आहे. दोन महिन्यांपूर्वी सिडकोने महापालिकेला पत्र पाठवून १ ऑक्टोबरनंतर कचरा उचलण्याची जबाबदारी तुमची असेल, असा ‘अल्टीमेटम’ दिला आहे. शहरातील कचराप्रश्न यशस्वीपणे सोडवू न शकलेल्या महापालिकेला सिडको वसाहतीतील तब्बल दररोजचा ३००टन कचरा उचलणे झेपणारे नाही.

महापालिकेने स्थापन केलेल्या कचऱ्याच्या प्रश्नासंदर्भात सिडकोशी समन्वय साधण्यासाठी समिती गठीत केली होती. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या उपस्थितीत या विषयावर बैठक झाली होती. मात्र १ ऑक्टोबरनंतर कचरा न उचलण्याच्या भूमिकेवर सिडको ठाम असल्याची कुणकुण लागताच सत्ताधाऱ्यांच्या पुढे एक पाऊल टाकत विरोधकांनी घाईघाईत पत्रकार परिषद घेऊन सिडकोने कचरा उचलला नाही तर सिडकोच्या गेटवर कचरा उचलून टाकू, अशी भूमिका घेतली आहे. शेकाप महाआघाडीने बुधवारी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची भूमिका स्पष्ट केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, महाआघाडीचे गटनेते प्रीतम म्हात्रे, शेकापचे जिल्हाचिटणीस गणेश कडू यांच्यासह नगरसेवक अरविंद म्हात्रे, हरेश केणी, रवी भगत आदी उपस्थित होते.

सिडकोच्या तळोजा येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे काम मागील दहा वर्षांपासून प्रलंबित आहे. हे काम सिडको आजवर पूर्ण करू शकली नाही. महापालिका हद्दीतील सिडकोच्या वसाहतीत अनेक कामे वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. सिडकोला भूखंडातून मिळणारा लाभ हवा आहे, मात्र नागरिकांना सोयीसुविधा देण्यास टाळाटाळ करते, महापालिकेचे अजून इतक्या मोठ्या वसाहतीचा कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची तयारी नसून सिडकोने कचरा उचलला नाही तर महापालिकेला मोठा आर्थिक बोजा पडेल, अशी भूमिका प्रीतम म्हात्रे यांनी घेतली तर सिडको उद्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पदेखील बंद करेल, अशी शंका अरविंद म्हात्रे यांनी व्यक्त केली.

स्थापनेआधीच प्रश्न

सुटायला हवा होता

महापालिका स्थापन करण्यापूर्वीच हे प्रश्न सुटायला पाहिजे होते, आता महापालिका स्थापनेनंतर नगरसेवकांनी नागरिकांचे प्रश्न सोडविण्याऐवजी सिडकोशी भांडत बसण्यात वेळ घालवायचा का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांनी केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज