अ‍ॅपशहर

महागृहनिर्माण योजनेच्या अर्ज नोंदणीस मुदतवाढ; 'या' वेबसाइटवर क्लिक करा

परवडणाऱ्या दरातील या घरांपैकी ४०४ घरे ही पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आणि उर्वरित ३,७५४ घरे ही सर्वसाधारण प्रवर्गासाठी उपलब्ध आहेत. तसेच अन्य योजनेअंतर्गत सिडकोच्या विविध गृहनिर्माण योजनांतील २४५ वाणिज्यिक गाळे आणि नवी मुंबईतील रेल्वे स्थानक संकुलांतील सहा वाणिज्यिक जागा विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

Edited byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 6 Oct 2022, 9:11 am
नवी मुंबई : नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद आणि मागणीमुळे सिडकोच्या ४,१५८ घरांच्या ऑगस्ट-२०२२ महागृहनिर्माण योजनेसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी करण्यासाठी, ३ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सिडकोने घेतला. या अनुषंगाने अनामत रक्कम व शुल्क भरणा, संगणकीय सोडत या प्रक्रियांनाही मुदतवाढ देण्यात आली. तसेच सिडकोच्या विविध गृहनिर्माण योजनांतील वाणिज्यिक गाळ्यांच्या आणि नवी मुंबईतील रेल्वे स्थानक संकुलांतील वाणिज्यिक जागांच्या विक्री योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासही ९ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cidco
महागृहनिर्माण योजनेच्या अर्ज नोंदणीस मुदतवाढ


सिडकोतर्फे ३१ ऑगस्ट रोजी ऑगस्ट-२०२२ महागृहनिर्माण योजनेअंतर्गत नवी मुंबईतील द्रोणागिरी, कळंबोली, तळोजा आणि खारघर नोडमधील सिडकोच्या गृहसंकुलांतील ४,१५८ घरे विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आली होती. परवडणाऱ्या दरातील या घरांपैकी ४०४ घरे ही पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आणि उर्वरित ३,७५४ घरे ही सर्वसाधारण प्रवर्गासाठी उपलब्ध आहेत. तसेच अन्य योजनेअंतर्गत सिडकोच्या विविध गृहनिर्माण योजनांतील २४५ वाणिज्यिक गाळे आणि नवी मुंबईतील रेल्वे स्थानक संकुलांतील सहा वाणिज्यिक जागा विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

सुधारित वेळापत्रकाप्रमाणे महागृहनिर्माण योजना ऑगस्ट-२०२२साठी ऑनलाइन अर्ज नोंदणी ३ नोव्हेंबरपर्यंत करता येणार आहे. अर्ज ४ नोव्हेंबरपर्यंत सादर करता येणार आहेत. ऑनलाइन शुल्क भरणा ७ नोव्हेंबरपर्यंत करता येईल. स्वीकृत अर्जदारांची प्रारूप यादी १४ नोव्हेंबर रोजी, तर स्वीकृत अर्जदारांची अंतिम यादी १८ नोव्हेंबर रोजी सिडकोच्या https://lottery.cidcoindia.com या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात येईल. योजनेची संगणकीय सोडत २२ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. सुधारित वेळापत्रकाप्रमाणे सिडको गृहनिर्माण संकुलांतील वाणिज्यिक गाळे आणि रेल्वे स्थानक संकुलांतील वाणिज्यिक जागांच्या विक्री योजनेसाठी ऑनलाइन अर्ज, अनामत रक्कम व प्रक्रिया शुल्क भरणा ९ नोव्हेंबरपर्यंत करता येणार आहे. बंद निविदा ८ नोव्हेंबरपर्यंत सादर करता येणार आहेत. ई-लिलाव ९ नोव्हेंबर रोजी पार पडून ११ नोव्हेंबरला निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

महत्वाचे लेख