अ‍ॅपशहर

एलईडी मासेमारीला वाढता विरोध

खोल समुद्रात केल्या जाणाऱ्या एलईडी मासेमारी पद्धतीमुळे पारंपरिक मासेमारी धोक्यात आल्याचा आरोप करत मच्छीमार खलाशांनी यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. आता काम करणाऱ्या खलाशांनीच एलईडी मासेमारी नौकेवर न जाण्याचा निर्णय घेतल्याने अशा नौकामालकांची पंचाईत होणार आहे. या प्रकरणी लवकरच बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती अखिल भारतीय मच्छीमार खलाशी संघाचे अध्यक्ष विश्वनाथ म्हात्रे यांनी दिली.

Maharashtra Times 17 Jul 2017, 3:01 am
पारंपरिक व्यवसायाला धोका बसण्याची भीती
महाराष्ट्र टाइम्स.कॉम fishers opposes for led fishing
एलईडी मासेमारीला वाढता विरोध


म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई

खोल समुद्रात केल्या जाणाऱ्या एलईडी मासेमारी पद्धतीमुळे पारंपरिक मासेमारी धोक्यात आल्याचा आरोप करत मच्छीमार खलाशांनी यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. आता काम करणाऱ्या खलाशांनीच एलईडी मासेमारी नौकेवर न जाण्याचा निर्णय घेतल्याने अशा नौकामालकांची पंचाईत होणार आहे. या प्रकरणी लवकरच बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती अखिल भारतीय मच्छीमार खलाशी संघाचे अध्यक्ष विश्वनाथ म्हात्रे यांनी दिली.

खोल समुद्रात प्रखर एलईडी दिव्यांचा वापर करून मोठ्या प्रमाणात मिळणाऱ्या मासळीने प्रचंड आर्थिक नफा होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस या एलईडीने मासेमारी करण्याचे प्रमाणही वाढत आहे. या पद्धतीत सरसकट सर्व जातींची व आकाराची मासळी मिळते. मात्र छोट्या माशांची प्रचंड नासाडी होत असल्याने भविष्यात मासळीचा दुष्काळ पडण्याची भीती या क्षेत्रातील जाणकर व्यक्त करत आहेत. एलईडी मासेमारीला कायदेशीर मान्यता असली तरी त्यात आर्थिक गुंतवणूक अधिक असल्याने सामान्य ट्रॉलर व्यावसायिक याकडे वळत नाहीत. लाखो रुपयांचे एलईडी बल्ब तसेच ट्रॉलरवर मोठे जनरेटर लावून मासेमारी करणे छोट्या मच्छीमारांना शक्य नाही. मासेमारी व्यवसायात यांत्रिक आधुनिकता आणण्याबाबत वेगवेगळे मतप्रवाह असले तरी सर्वंकष विचार करणारे मच्छीमार व्यावसायिक, त्यावर काम करणारे खलाशी (मच्छीमार) यांचे मत याहून वेगळे आहे. आधुनिकता असावी पण मासेमारी व्यवसाय उद्ध्‍वस्त होणारी नको, असे त्यांचे म्हणणे आहे. यापूर्वी स्पीड फिशिंग व ट्विन फिशिंग बंद करण्याची मागणीही या खलाशांकडून केली जात होती. एलईडी फिशिंगमध्ये प्रखर दिव्यांमुळे खलाशांच्या डोळ्यांना इजा होत असल्याचे प्रत्यक्ष काम करणाऱ्यांचे म्हणणे आहे. शिवाय, या बोटींवर काम करणाऱ्या खलाशांचे प्रमाण जेमतेम पाच टक्के असले तरी मासळीचा प्रचंड उपसा आणि होणारी प्रचंड नासाडी यामुळे समुद्रात मासळीची दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे उर्वरित ९५ टक्के खलाशी बांधवांवर उपासमारीची वेळ येऊ शकते, असेही काही खलाशांचे म्हणणे आहे. अशी होते एलईडी मासेमारी

एलईडी बल्ब मोठ्या यांत्रिकी बोटीतील जनररेटरच्या सहाय्याने प्रकाशित केले जातात. या प्रखर दिव्यांच्या प्रकाशाकडे आजूबाजूच्या १० किमी परिघातील मासे आकर्षिले जातात. ८००-९०० मीटर लांबीचे व ४० मी. खोलीच्या लावलेल्या जाळ्यात मोठ्या प्रमाणात मासे फसतात. त्यापैकी महत्त्वाचे मोठे मासे उचलून बाकीचे तसेच टाकून दिले जातात. यात माशांची मोठी नासाडी होते. राज्याच्या समुद्री हद्दीबाहेर १२ नॉटिकल मैलाच्या पुढे केंद्रांच्या हद्दीत मासेमारी केली जाते. यासंदर्भात अलिबाग येथे नुकत्याच दोन बैठका झाल्या आहेत. यातील संमत ठरावांची चर्चा जिल्हा सल्लागार समितीत करून तसा अहवाल राज्य सरकारला दिला जाणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज