नवी मुंबई : सायन-पनवेल मार्गावर वाशी येथील उड्डाणपुलावर सोमवारी पहाटे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत पाच जण जखमी झाल्याची घटना घडली. विशेष म्हणजे हे दोन्ही अपघात पाऊण तासाच्या कालावधीत एकाच ठिकाणी डम्परच्या धडकेमुळे झाले. वाशी पोलिसांनी या दोन्ही अपघातांची नोंद करून दोन्ही डम्परचालकांना अटक केली.
सायन-पनवेल मार्गावरील वाशी येथील उड्डाणपुलाच्या उतारावर सोमवारी पहाटे घडलेल्या पहिल्या अपघातात नवी मुंबईतून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या डम्परचालकाला वाशी येथील उड्डाणपुलावरील उतारावर डंपरचा वेग आवरता न आल्याने डम्पर पुढे असलेल्या ओमनी कार व एक्सयूव्ही कारला धडकली. या अपघातात ओमनी कारमधील मारुती उबारे (५०), त्यांची पत्नी रूपाली उबारे (४५), मुलगा मयूर आणि सासू जयश्री नाईक हे चौघे जखमी झाले. उबारे कुटुंबीय हे गावावरून मुंबईत विलेपार्ले येथे परतत होते. या चौघांना महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या अपघातानंतर सकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास त्याच ठिकाणी घडलेल्या दुसऱ्या अपघातात भरधाव डम्परची स्कूटीला धडक बसली. या अपघातातदेखील डम्परचालकाला उड्डाणपुलावरील उतारावर डम्परचा वेग आवरता आला नाही. त्यामुळे त्याची धडक स्कूटीला बसली. या अपघातात कामोठे येथून स्कुटीवरून मुंबईत कामावर जाणारा विकास शिंदे (३८) हा जखमी झाला. या अपघातात विकासचा पाय फ्रॅक्चर झाला असून त्यालादेखील महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. वाशी पोलिसांनी या दोन्ही अपघातांतील डम्परचालकावर गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली.