अ‍ॅपशहर

दादांविरोधात ताई मैदानात

गणेश नाईक यांना उत्तर देण्यासाठी आमदार मंदा म्हात्रे यांना लागलीच निमंत्रित करून तुमच्याकडे दादा तर आमच्याकडे ताई आहेत, असा इशाराच जणू भाजपने दिला आहे.

Maharashtra Times 18 May 2017, 3:00 am
म. टा. वृत्तसेवा, पनवेल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ganesh naik opposite manda mhatre
दादांविरोधात ताई मैदानात


पनवेल महापालिका निवडणुकीचा प्रचार आता रंगात आला आहे. महाआघाडीने नवी मुंबईची महती सांगण्यासाठी नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा गणेश नाईक यांना नवीन पनवेल येथे निमंत्रित केले होते. यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली होती. त्यानंतर गणेश नाईक यांना उत्तर देण्यासाठी आमदार मंदा म्हात्रे यांना लागलीच निमंत्रित करून तुमच्याकडे दादा तर आमच्याकडे ताई आहेत, असा इशाराच जणू भाजपने दिला आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शेकापच्या महाआघाडीने दोन दिवसांपूर्वी नवीन पनवेल प्रभाग क्रमांक १७मध्ये प्रचारसभेसाठी गणेश नाईक यांनी निमंत्रित केले होते. यावेळी तेथील शेकापचे उमेदवार संदीप पाटील यांच्या विकासकामांच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी माजी आमदार विवेक पाटील यांनी गणेश नाईक यांच्यासमोर

नवी मुंबईच्या विकासाचा पाढा वाचला. सत्ता आल्यास पनवेललादेखील नवी मुंबईसारखे बनवण्याचा आम्ही प्रयत्न करू, अशी घोषणा त्यांनी केली. गणेश नाईक यांनीदेखील स्वतःच्या कामांचा लेखाजोखा मांडला. नवी मुंबईचे दादा पनवेलमध्ये येऊन महाआघाडीचा प्रचार करतात, हे पाहून भाजपनेदेखील लागलीच आमदार मंदा म्हात्रे यांना प्रचाराचे निमंत्रण दिले. त्या मंगळवारी सायंकाळी प्रचारफेरीत सहभागी झाल्या होत्या. यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतदेखील त्या उपस्थित होत्या. नवी मुंबई महापालिकेत सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादीसारखी आम्हाला भ्रष्ट्राचार करत असलेली महापालिका आणायची नाही, अशा शब्दांत नाईक यांना म्हात्रे यांनी उत्तर दिले. इमारती ३० वर्षे जुन्या झाल्या, तरी जमिनीवर मालकी मात्र सिडकोची, हे योग्य नसून मुख्यमंत्री फडणवीस यांनी जमिनी ‘फ्री होल्ड’ करण्याचे आश्वासन दिले आहे, असे सांगत त्यांनी गणेश नाईक यांच्यावर निशाणा साधला.

स्वतःहून योगदान देण्यासाठी प्रथा

भाजपमध्ये कोणतीही जबाबदारी देण्याची पद्धत नसून प्रत्येकाने स्वतःहून योगदान देण्याची प्रथा आहे. त्याप्रमाणे मीदेखील पनवेलच्या निवडणुकीसाठी आल्याचे मंदा म्हात्रे यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज