अ‍ॅपशहर

पत्रकार सुधीर सुर्यवंशी यांच्यावर हल्ला

पत्रकार सुधीर सुर्यवंशी आणि त्यांचे मित्र संतोष खताते यांच्यावर नवी मुंबईतील खारघर येथे आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास चार ते पाच अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला असून या हल्ल्यात सुधीर व संतोष गंभीर जखमी झाले आहेत. दोघांनाही तातडीने जवळच्याच मेडिसिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Maharashtra Times 31 Mar 2017, 9:24 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम journalist sudhir suryawanshi attacked by three unidentified persons in navi mumbai
पत्रकार सुधीर सुर्यवंशी यांच्यावर हल्ला


पत्रकार सुधीर सुर्यवंशी आणि त्यांचे मित्र संतोष खताते यांच्यावर नवी मुंबईतील खारघर येथे आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास चार ते पाच अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला असून या हल्ल्यात सुधीर व संतोष गंभीर जखमी झाले आहेत. दोघांनाही तातडीने जवळच्याच मेडिसिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

खारघरमधील सेक्टर १२ मध्ये असलेल्या चतुर्भुज बिल्डिंगजवळ ही घटना घडली. सुधीर आणि संतोष हे पनवेलहून काही कामानिमित्त संतोष यांच्या स्विफ्ट कारने खारघर येथे आले होते. तेथेच संतोष यांच्या कारचे टायर पंक्चर करून सुधीर आणि संतोष यांना लक्ष्य करण्यात आले. हल्लेखोर तोंडावर रुमाल बांधून आले होते. हातातील हॉकी स्टिकने त्यांनी सुधीर यांच्यावर हल्ला केला. सुधीर यांनी त्यांना तुम्ही कोण आहात आणि आम्हाला का मारहाण करत आहात?, अशी विचारणा केली व रोखण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानंतही हल्लेखोर थांबले नाहीत. हल्लेखोर दोघांनाही मारहाण करून मोटरसायकलवरून पसार झाले. हल्लेखोरांनी केलेल्या जबर मारहाणीत सुधीर यांचा हात फ्रॅक्चर झाला असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे, असे सांगण्यात आले.

याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात दाखल झाले असून तपास सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांनी दिली.

सुधीर हे डीएनए या इंग्रजी वर्तमानपत्रात असून त्यांच्यावरील हल्ल्याचा मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघ, मराठी पत्रकार परिषद व पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीसह विविध संघटनांनी निषेध केला आहे.

हल्ल्याचा विरोधी पक्षनेत्यांकडून निषेध

सुधीर सूर्यवंशी यांच्यावर झालेला हल्ला निषेधार्ह असून त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. या हल्ल्याचे वृत्त कळताच विखे पाटील यांनी सुधीर सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधून माहिती जाणून घेतली. यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी म्हटले आहे की, राजकारणातील वाढते गुन्हेगारीकरण ही चिंतेची बाब आहे. पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांच्यावरील हल्ला का व कुणी केला याचा पोलिसांनी तातडीने छडा लावावा आणि हल्लेखोरांना अटक करून त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करावी अशीही मागणी त्यांनी केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज