अ‍ॅपशहर

महापालिकेच्या इमारतींवर सौर यंत्रणा

पनवेल महापालिकेच्या मालकीच्या इमारतींवर सौर यंत्रणा बसविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सौरउर्जेचा वापर करून महापालिकेच्या तिजोरीवर येणारा वीजभार यामुळे कमी होणार आहे.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 7 Jan 2022, 3:05 pm
म. टा. वृत्तसेवा, पनवेल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम प्रतिनिधीक फोटो


पनवेल महापालिकेच्या मालकीच्या इमारतींवर सौर यंत्रणा बसविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सौरउर्जेचा वापर करून महापालिकेच्या तिजोरीवर येणारा वीजभार यामुळे कमी होणार आहे. महापालिकेच्या पाच इमारतींवर ही यंत्रणा बसविण्यासाठी महापालिका प्रशासनाने सर्वसाधारण सभेपुढे हा प्रस्ताव ठेवला आहे.

सौरऊर्जेचा वापर करून वीजयंत्रणेचा खर्च कमी करण्यासाठी पनवेल महापालिकेने 'वर्ल्ड इन्स्टिट्यूट ऑफ सस्टेनेबल एनर्जी' या संस्थेची तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती. यानुसार संबंधित एजन्सीने पनवेल महापालिकेच्या मालकीची अग्निशमन इमारत, महापालिकेचे फडके नाट्यगृह, मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र, विलासराव देशमुख व्यापारी संकुल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन आदी ठिकाणी सौर यंत्रणा राबविण्याचा अहवाल प्रशासनाला सादर केला होता. या इमारतींना ६ ते १५ लाखापर्यंतचा खर्च येणार आहे. या यंत्रणेमुळे महापालिकेचा दरमहा लाखोंचा वीजबिलाचा खर्च वाचणार आहे. सौर यंत्रणा बसविण्यासाठी महापालिका एकूण १ कोटी ५० लाख नऊ हजार रुपयांचा खर्च करणार आहे. सध्या महापालिका वेगवेगळ्या इमारतींच्या वीजबिलासाठी कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र सौरऊर्जेवर आधिरित वीजयंत्रणा बसविल्यास या इमारती विजेसाठी इतरांवर अवलंबून न राहता स्वत:च स्वत:च वीजनिर्मिती करू शकणार आहेत. त्यामुळे महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. याचा सर्वाधिक फायदा पनवेल महापालिकेच्या नाट्यगृहासाठी होणार आहे. नाट्यगृह भाडेतत्त्वावर देऊन मिळणारे उत्पन्न आणि नाट्यगृह चालविण्यासाठी लागणारा खर्च पाहिल्यास मोठी तफावत आहे. त्यामुळे महापालिकेचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. महापालिकेच्या नव्या मुख्यालयात ही यंत्रणा बसविण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला होता. आता इतर लहान इमारतींमध्येही ही सौर यंत्रणा बसविल्यामुळे महापालिकेच्या कोट्यवधी रुपयांची बचत होईल, अशी अपेक्षा आहे. सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळविण्यासाठी आयुक्त गणेश देशमुख यांनी हा विषय सर्वसाधारण सभेत ठेवला आहे. सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळाल्यानंतर पुढील निविदा प्रक्रियेला सुरुवात होईल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज