म. टा विशेष प्रतिनिधी, मुंबई
भायखळा येथील डॉ. भाऊ दाजी लाड वस्तूसंग्रहालयात लिफ्ट कोसळून जखमी झालेल्या डॉ. अरनवाज हवेवाला (वय ६३) या महिला दंतवैद्यकाचा उपचारादरम्यान गुरुवारी रुग्णालयात मृत्यू झाला. इतका गंभीर प्रकार वस्तूसंग्रहालयाच्या व्यवस्थापनाने महापालिका प्रशासन किंवा महापौरांना न कळवल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिले आहेत.
डॉ. हवेवाला व त्यांची मुलगी हेरा (२८) या २८ एप्रिल रोजी डॉ. भाऊ दाजी लाड वस्तूसंग्रहालय बघण्यासाठी गेल्या होत्या. तळमजल्यावरील संग्रहालय पाहून झाल्यानंतर त्या लिफ्टने पहिल्या मजल्यावरील संग्रहालयात गेल्या. तेथून लिफ्टने खाली येत असताना अचानक लिफ्ट कोसळली. या दुर्घटनेत डॉ. हवेवाला व त्यांची मुलगी जखमी झाली. वस्तूसंग्रहालय व्यवस्थापनाने त्यांना भायखळा येथील मसिना रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान डॉ. हवेवाला यांचा गुरुवारी मृत्यू झाला. वस्तूसंग्रहालयाचे व्यवस्थापनाने ही बाब न कळवल्याने महापौरांनी संताप व्यक्त केला आहे असून, विश्वस्त व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश महापौरांनी दिले आहेत.
समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी वस्तुसंग्रहालयाचे सर्व प्रशासकीय अधिकार पालिकेने ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू करावी, अशी मागणी केली आहे.