अ‍ॅपशहर

स्फोटाचे तडाखे ग्रामस्थांनाच

तळोजा एमआयडीसीतील रामके कंपनीत झालेल्या स्फोटात जवळपासच्या पंधरा गावांना हादरा बसला. शेकडो घरांना तडे गेले, इतका गंभीर प्रकार घडूनही सरकारी यंत्रणांनी कंपनीविरोधात दुसऱ्या दिवशीदेखील गुन्हा दाखल केलेला नाही.

Maharashtra Times 31 Oct 2018, 12:41 am
म. टा. वृत्तसेवा, पनवेल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम blast


तळोजा एमआयडीसीतील रामके कंपनीत झालेल्या स्फोटात जवळपासच्या पंधरा गावांना हादरा बसला. शेकडो घरांना तडे गेले, इतका गंभीर प्रकार घडूनही सरकारी यंत्रणांनी कंपनीविरोधात दुसऱ्या दिवशीदेखील गुन्हा दाखल केलेला नाही. याउलट औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाने कंपनीने काळजी घेतल्यामुळे मोठा अनुचित प्रकार टळला असल्याचे म्हटल्यामुळे कंपनीला सरकारी यंत्रणेने क्लीनचिट दिल्याचे बोलले जात आहे.

सोमवारी सकाळी ८ वाजता तळोजा औद्योगिक वसाहतीतील रामके ग्रुपच्या मुंबई वेस्ट मँनेजमेंट लिमिटेड कंपनीत स्फोट झाला. रायगड, मुंबई आणि ठाण्यातील विविध रसायनांचे विघटन करण्यासाठी कंपनीत मोठ्या प्रमाणात रसायने आणून जमिनीत गाडली जातात. सोमवारी सकाळी रसायनांच्या बाटल्या जेसीबीच्या सहाय्याने फोडत असताना जमिनीत यापूर्वी गाडलेल्या रसायन आणि काचेच्या बाटल्यांमध्ये असलेले रसायन याचा मिलाप होऊन मोठा स्फोट झाला. कंपनीच्या परिसरातील १५ गावांना याचा फटका सहन करावा लागला. भूकंप झाल्याप्रमाणे बसलेल्या हादऱ्यामुळे शेजारील ग्रामस्थ हादरून गेले. सकाळीच ग्रामस्थांनी रामके कंपनीच्या गेटवर जाऊन जाब विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र सुरुवातीला काहीच झाले नाही, असे सांगणाऱ्या कंपनीत ग्रामस्थांनी बळजबरीने घुसून पाहणी केली असता एका ठिकाणी मोठा खड्डा पडलेला दिसला. जेसीबी विचित्र पद्धतीने उलटा पडला असल्याचे आढळले. ग्रामस्थांनी व्यवस्थापनाच्या विरोधात निषेध व्यक्त करीत कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी मागणी केली.

स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर, महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्यासह नगरसेवकांनी या ठिकाणी भेट देऊन कंपनी बंदला पाठिंबा दिला. एवढा मोठा प्रकार घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी औद्योगिक सुरक्षा मंडळ, आरोग्य विभागाने कंपनीला क्लीनचिट दिली आहे. रामके कंपनी व्यवस्थापनाने घटना घडताच पुढील खबरदारी घेतल्यामुळे मोठा अनुचित प्रकार घडला नसल्याची नोंद औद्योगिक सुरक्षा विभागाचे सहसंचालक एम. आर. पाटील यांनी केली आहे. त्यामुळे शेकडो घरांना तडे जाऊन भुकंपसदृश्य परिस्थितीला जबाबदार कोण, असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत. या स्फोटांत जखमी झालेला जेसीबीचालक संतोष पाटील याच्या डोळ्याला काचा लागल्यामुळे पोलिस त्याच्याकडून माहिती घेऊ शकले नसल्यामुळे गुन्हा दाखल झाला नाही, अशी माहिती या प्रकरणाचा तपास करणारे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजू तडवी यांनी दिली. संबंधित प्रकरणाची माहिती घेऊन घटनेला जबाबदार असलेल्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा विश्वास तळोजा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी व्यक्त केला.

पोकलेनचा नांगर शेतात?

रसायनाचे विघटन करण्यासाठी बाटल्या फोडण्यात आलेल्या पोकलेनचे नुकसान झाले आहे. स्फोटाच्या हादऱ्यामुळे पोकलेनचे बकेट तुटून नांगरासारख्या आकाराचा एक तुकडा शंभर ते दीडशे मीटर अंतरावर असेलल्या आत्माराम पाटील यांच्या शेतात सापडला आहे. हा लोखंडी तुकडा तीन किलो वजनाचा आहे. हा तुकडा या कंपनीत अपघात झालेल्या पोकलेनचाच असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज