अ‍ॅपशहर

अखेर आदिवासी मुली हक्काच्या वसतिगृहात

पनवेल तालुक्यात एकमेव असलेले आदिवासी मुलींचे वसतिगृह हक्काच्या इमारतीत बुधवारी स्थलांतरित झाले.

Maharashtra Times 11 Aug 2017, 3:00 am
जागतिक आदिवासी दिनी केला वसतिगृह प्रवेश
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tribal girls got hostel
अखेर आदिवासी मुली हक्काच्या वसतिगृहात


म. टा. वृत्तसेवा, पनवेल

पनवेल तालुक्यात एकमेव असलेले आदिवासी मुलींचे वसतिगृह हक्काच्या इमारतीत बुधवारी स्थलांतरित झाले. जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते या वसतिगृहाचे उद्घाटन करण्यात आले. यापूर्वी भाड्याच्या इमारतीत अडगळीत सुरू असलेले वसतिगृह सोडून मुली तीन मजल्यांच्या प्रशस्त इमारतीत राहून पुढील शिक्षण घेणार आहेत.

एकात्मिक विकास प्रकल्प, पेण कार्यालयांतर्गत येणाऱ्या आदिवासी मुलींना अनेक वर्षांपासून हक्काची इमारत नव्हती. पनवेलजवळ सुकापूर येथे भाडेतत्त्वावर घेतलेल्या इमारतीत वसतिगृह सुरू होते. अडगळीत सोयीसुविधा नसताना मुली येथे राहत होत्या. २०११मध्ये पनवेलच्या आदिवासी मुलांच्या वसतिगृहाचे तत्कालीन गृहपाल विजय मोरे यांनी प्रयत्न करून सिडकोकडून खांदा कॉलनीत मुलींच्या वसतिगृहासाठी भूखंड मिळवला होता. त्यानंतर आदिवासी विकास विभागाच्या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागाला इमारतीचे काम दिले. मात्र कंत्राटदाराचा खून झाल्यामुळे मागील सात वर्षांपासून वसतिगृहाचे काम रखडले होते. अखेर उशिरा का होईना आदिवासी मुलींची सोय झाली असून १२५ मुलींना राहता येईल, असे अद्ययावत वसतिगृह तयार झाले आहे.

तीन मजल्यांच्या इमारतीत प्रशस्त खोल्या आहेत. शहरात वसतिगृह असल्यामुळे मुलींना शहरापासून दूर जाण्याचा प्रवासखर्च यापुढे वाचणार आहे. मुलींच्या सांगण्यावरून आदिवासी विकास विभागाच्या पेण प्रकल्प कार्यालयाने जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून उद्घाटनाचा कार्यक्रम हाती घेतला होता. बुधवारी उत्साहात हा कार्यक्रम पार पडला. पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते नव्या इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार आले. महापौर चौतमोल यांनी मुलींनी या वसतिगृहाचा वापर करून शिक्षण घेऊन आपले भविष्य उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा यावेळी दिल्या. कार्यक्रमाला प्रभारी सहाय्यक प्रकल्प अधिकारी डी. डी. काळपांडे उपस्थित होत्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज