म. टा. वृत्तसेवा, अलिबाग
अलिबाग येथील रायगड जिल्हा रुग्णालयातील दोन वॉर्डबॉयना करोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर अलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. यापूर्वी रायगडमध्ये आरोग्य सेवेतील महाड व कर्जत येथील परिचारिका, कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील दोन डॉक्टर व माथेरान येथील एका डॉक्टरला करोनाची लागण झाली होती. महाड येथील महिला कर्मचारी करोनाचा यशस्वीपणे मुकाबला करून घरी परतल्या आहेत. वॉर्डबॉयना करोनाचा संसर्ग झाल्याने रुग्णालयातील चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून त्यांनी सुरक्षाविषयक साधने उपलब्ध व्हावीत, अशी मागणी केली आहे.