अ‍ॅपशहर

पनवेल पुलावरून संततधार

पनवेल शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलावरून खालच्या रस्त्यावर सध्या अनेक धबधबे वाहत आहेत. हे धबधबे नैसर्गिक नसून एमएमसआरडीसीच्या दुर्लक्षामुळे तयार झाले आहेत. पुलावरील पाणी वाहून नेणारे पाइप फुटल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर पडत आहे.

Maharashtra Times 12 Aug 2017, 3:00 am
पाइप फुटल्याने वाहनचालकांना ठरतोय अडथळा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम water falls from panvel bridge
पनवेल पुलावरून संततधार


म. टा. वृत्तसेवा, पनवेल

पनवेल शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलावरून खालच्या रस्त्यावर सध्या अनेक धबधबे वाहत आहेत. हे धबधबे नैसर्गिक नसून एमएमसआरडीसीच्या दुर्लक्षामुळे तयार झाले आहेत. पुलावरील पाणी वाहून नेणारे पाइप फुटल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर पडत आहे.

पनवेल शहरातील वाहतूककोंडी सुटावी म्हणून रस्ते विकास महामंडळाने अडीच किलोमीटरचा पूल पनवेलमध्ये बांधला आहे. पाच वर्षांनंतर पुलाखाली वृक्षारोपण, रंगरंगोटी करून पुलाला महापालिका निवडणुकीपूर्वी सजवण्यात आले. पुलावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या पाइपची पुलाच्या उद्घाटनानंतर अवघ्या एक वर्षाच्या आतच दुरवस्था झाली. त्यामुळे पुलाचे पाणी पाइपमधून गटारात जाण्याऐवजी खाली कोसळते. त्यामुळे पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. जोरदार पाऊस झाल्यास दुचाकीस्वारांना यातून मार्ग काढताना अपघाताची भीती वाटत आहे. पाऊस नसतानाही पाणी वाहून जाईपर्यंत बराच वेळ पाणी पडत असल्यामुळे दुचाकीस्वार भिजतात. पूल उभारल्यानंतर एकदाही पुलाची डागडुजी करण्यात आलेली नाही. पनवेल-सायन मार्गावरील या पुलाचा उतार पनवेल-सायन रस्त्यावर दिला आहे. सायन-पनवेल बाजूकडे पाणी पडत नाही. मात्र पनवेल-सायन मार्गावर नवीन पनवेल चौकापासून अमरधाम स्मशानभूमीपर्यंत हे पुलावरचे पाणी त्रासदायक ठरत आहेत.

पुलाखाली वृक्षारोपण केले, खांबांवर आदिवासी चित्रे काढली, रंगकाम केले म्हणून पनवेलच्या सौंदर्यात भर पडली आहे, ही चांगली बाब आहे. परंतु नागरिकांना पुलावरून पडणाऱ्या पाण्याचा त्रास होतो, याकडेही प्रशासनाने लक्ष द्यावे.
- परशुराम पाटील, वाहनचालक

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज