अ‍ॅपशहर

काय असते वेळ अमावस्या; कोण आणि का साजरी करतात? महाराष्ट्रात फक्त...

Vel Amavasya: वेळ अमावस्या ही आनंददायी सण म्हणून साजरी केली जाते. महाराष्ट्रातील लातूर, उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यात साजरी होणारी ही अमावस्या कशी साजरी होते जाणून घ्या...

| Edited byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Dec 2022, 3:15 pm
उस्मानाबाद: जिल्हयात आज वेळ अमावस्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. बळीराजाचा हा मुख्य सण असतो. आजच्या दिवशी बळीराजाच संपूर्ण कुटुंब शेतात असते. सोबतीला मित्र नातलग पै-पाहुणे वन भोजनाचा आनंद लुटायला असतात. आजच्या दिवशी शहर व ग्रामीण भागातील गाव खेड्यात शुकशुकाट असतो निर्मनुष्य असते. कर्कश असणारा आवाज, लोकांची वर्दळ, असणारी शहरे, गावे आज शांत असतात.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम vel amavasya


वेळ अमावस्या...

आज मार्गशीर्ष अमावस्या ही म्हणजे वेळा अमावस्या. मुळात अमावस्या म्हणले की एक भिती असते, पण दिवाळी आणि आजची अमावस्या हे सण आनंददायी सण म्हणून साजऱ्या होणाऱ्या अमावस्या मानल्या जातात. आपल्या महाराष्ट्राला अनेकविध सणांची भलीमोठी परंपरा आहे. त्यातलाच हा एक सण. ही वेळा अमावस्या लातूर, उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यातल्या काही भागात साजरी होते. तसे पाहायला गेले तर हा आहे मूळचा कर्नाटकातला सण. तिथून तो महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात आला आहे. उर्वरीत महाराष्ट्रमध्ये बहुतेक हा सण साजरा केला जात नाही.

शेताच्या काळ्या आईच्या पूजेचा. ही आई आपल्याला धान्य देते, पालनपोषण करते, तिचे उपकार स्मरण्याचा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. या दिवशी शिवार गर्दीने फुलून गेले असतात. प्रत्येक शेतात घरातील लोक,पै पाहुणे, मित्रमंडळी यांच्यामुळे सगळे शिवार माणसाने फुलून जातात.

ज्या भागात जे मुख्य पीक असते त्या भागात त्याला लक्ष्मी म्हटले जाते. या दिवसांत वेळा अमावास्येचा मेनू हा थंडीला सामोरे ठेऊन तयार केला जातो. हे पदार्थ थंडीच्या दिवसात खाणे आरोग्यासाठी अतिशय चांगले असते. या काळात रान विविध भाज्यांनी फुललेले असते. त्यामुळे सोळा भाज्या एकत्र करून त्याची भाजी बनवली जाते. बाजरी ऊर्जा देते म्हणून बाजरीचे पीठ उकडून त्याचे उंडे बनवले जातात. गुळसुद्धा उष्ण असतो म्हणून गूळ घालून गव्हाची खीर आणि हे सगळे पचवण्यासाठी ज्वारीचे पीठ रात्रभर ताकात मुरवून केलेली आंबील, या सर्व पदार्थांनी आधी धरणीमातेची ओटी भरतात.

या दिवशी शेतात कडब्याची म्हणजे धान्यांच्या वाळलेल्या धाटांची खोप बांधतात. पाच पांडवांची आणि इतर देवतांची पूजा करुन नैवेद्य दाखवतात. पूजेनंतर सगळेजण एकत्र बसून जेवणाचा आस्वाद घेतात. हा कार्यक्रम इतका महत्त्वाचा असतो की ज्यांचे स्वतःचे शेत नाही त्यांना दुसऱ्यांच्या शेतात आग्रहाने बोलावतात.

या दिवशी सगळ्याचा संध्याकाळपर्यंत शेतात मुक्काम असतो. उन्हं उतरली की लोक परतीच्या वाटेला लागतात. एक दिवस काळ्या आईच्या सान्निध्यात राहायच या सणाची पुढच्या वर्षी पर्यंत आतुरतेने वाट पाहिली जाते.

महत्वाचे लेख