अ‍ॅपशहर

शिवसेनेला धनुष्यबाण निवडणूक चिन्हं कसं मिळालेलं? परभणीशी आहे खास कनेक्शन

Shiv Sena News : धनुष्यबाण हे प्रभू श्रीरामचंद्रांचं शस्त्र असल्यामुळे बाळासाहेब ठाकरेंनी निवडणूक चिन्ह उत्साहाने स्वीकारलं. हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करणाऱ्या केशरी रंगाचा वापर त्यात करण्यात आला.

Authored byअनिश बेंद्रे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Sep 2022, 8:51 pm

हायलाइट्स:

  • शिवसेना आणि धनुष्यबाण हे नातं कसं जुळलं
  • १९८९ मध्ये मतदानाची आवश्यक टक्केवारी मिळाली
  • १९९० च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना धनुष्यबाण चिन्हासह
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
मुंबई : पक्ष चिन्हाबाबत निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कारवाईला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नकार दिला आहे. त्यामुळे शिवसेनेचे अधिकृत निवडणूक चिन्ह धनुष्य बाण कोणाला मिळणार, याचा निर्णय घेण्यास निवडणूक आयोग मोकळे आहे. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कोणाला मिळणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. मुळात शिवसेना आणि धनुष्यबाण हे नातं कसं जुळलं, हे पाहुया.
शिवसेनेची स्थापना जून १९६६ मध्ये झाली. मात्र १९८८ मध्ये राजकीय पक्ष म्हणून नोंदणी करण्यासाठी शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव दिला. सोबतच स्वतःची घटनाही तयार केली. कागदपत्रांच्या पडताळणीनंतर शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली. मात्र मतदानाची आवश्यक टक्केवारी नसल्यामुळे त्यांना चिन्ह मिळू शकलं नव्हतं.

दरम्यान, १९८९ मध्ये शिवसेनेने लोकसभा निवडणूक लढवली. यासाठी शिवसेना-भाजपची युती झाली होती. त्यावेळी परभणीतून शिवसेनेचे उमेदवार म्हणून अशोकराव देशमुख रिंगणात उतरले होते. त्यांना धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळालं होतं.

देशमुखांसह शिवसेनेचे चार खासदार निवडून आले होते. आवश्यक मतांचा कोटा पूर्ण केल्याने शिवसेनेला मागणीप्रमाणे धनुष्यबाण मिळाले. एका अर्थाने परभणीमुळे शिवसेनेला धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळाले. १९९० च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने धनुष्यबाण चिन्हासह मैदानात उतरुन ४२ आमदार निवडून आणले.

हेही वाचा : ठाकरे गटाला धक्का! चिन्ह कोणाचं आणि खरी शिवसेना कोणाची निवडणूक आयोग ठरवणार

धनुष्यबाण हे प्रभू श्रीरामचंद्रांचं शस्त्र असल्यामुळे बाळासाहेब ठाकरेंनी निवडणूक चिन्ह उत्साहाने स्वीकारलं. हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करणाऱ्या केशरी रंगाचा वापर त्यात करण्यात आला.

धनुष्यबाण आणि विजय

१९६८ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत धनुष्यबाण निशाणीवर शिवसेनेने ४२ नगरसेवक निवडून आणले होते. तर १९८८ च्या औरंगाबाद महापालिका निवडणुकीत चंद्रकांत खैरेंसह २८ नगरसेवक विजयी झाले होते. झारखंड वगळता गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यातही शिवसेना धनुष्य बाण या निवडणूक चिन्हावर रिंगणात उतरते.

हेही वाचा : धनुष्यबाण ठाकरेंना की शिंदेंना? दोन निकषांच्या आधारे निवडणूक आयोग ठरवणार
लेखकाबद्दल
अनिश बेंद्रे
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा 'मास्टरमाईंड' | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव... आणखी वाचा

महत्वाचे लेख