पिंपळे गुरव येथे कस्टमची कारवाई
म. टा. प्रतिनिधी, पुणे
पिंपळे गुरव परिसरात कोकेन व एलईडी स्टॅम्प हे अमलीपदार्थ विक्री करणाऱ्या एका नायजेरियन व्यक्तीसह एका महिलेला सीमा शुल्क विभागाने (कस्टम) अटक केली आहे. त्यांच्याकडून कोकेन व एलईडी स्टॅम्प असा ११ लाख रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले आहे.
बकरे तोइरू (रा. निलकनाथ बिल्डिंग, पिंपळे गुरव) आणि अपूर्वा उपाध्याय (रा. बाणेर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. पिंपळे गुरव परिसरात एक नायजेरियन व्यक्ती कोकेनची विक्री करीत असल्याची माहिती कस्टमच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार कस्टमच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून नायजेरियन व्यक्तीच्या घराची झडती घेण्यात आली. त्या वेळी त्याच्या घरामध्ये तीन लाख २० हजार रुपये किमतीचे कोकेन आढळून आले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने अपूर्वा नावाच्या महिलेला अमलीपदार्थ देत असल्याचे सांगितले. त्याच्या माहितीवरून आरोपी महिलेच्या घरी छापा टाकण्यात आला. त्या वेळी आरोपी महिलेच्या घरात एलईडी स्टॅम्प, कोकेन असा आठ लाख ४० हजार रुपयांचे अमली पदार्थ आढळून आले. त्यानुसार कस्टमने दोघांवर एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.