अ‍ॅपशहर

‘एक शून्य शून्य’ आता इतिहासजमा! पोलिसांशी संपर्कासाठी 'हा' नवा क्रमांक

उत्तर प्रदेशासह देशातील २० राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही पोलिसांशी संपर्क साधण्याचा '१००' हा क्रमांक आता बदलला जाणार असून, '११२' या एकाच हेल्पलाइनवरून सर्व प्रकारची मदत मिळणार आहे.

Authored byरोहित आठवले | महाराष्ट्र टाइम्स 20 Oct 2020, 7:58 am
पिंपरी : उत्तर प्रदेशासह देशातील २० राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही पोलिसांशी संपर्क साधण्याचा '१००' हा क्रमांक आता बदलला जाणार असून, '११२' या एकाच हेल्पलाइनवरून सर्व प्रकारची मदत मिळणार आहे. पोलिस, अग्निशमनदल आणि महिला हेल्पलाइनची एकत्रित मदत उपलब्ध करून देण्यासाठी देशपातळीवर हा निर्णय घेतला जात आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ‘एक शून्य शून्य’ आता इतिहासजमा


आतापर्यंत देशातील २० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी एकच आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक '११२' स्वीकारला आहे. वर्षभरापूर्वी २६ ऑक्टोबरला उत्तर प्रदेश सरकारने १०० क्रमांक बंद करून '११२' ही हेल्पलाइन स्वीकारली होती. त्यानंतर आता महाराष्ट्र पोलिसांकडूनही या नव्या हेल्पलाइनचा अवलंब करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.

या वर्षाअखेरीपर्यंत राज्यात सर्वत्र '११२' हेल्पलाइन कार्यान्वित करण्यासाठी पोलिस प्रशासनाचे प्रयत्न आहेत. यासाठी सविस्तर प्रशिक्षण संबंधितांना दिले जाणार आहे. राज्यात असलेल्या पोलिस प्रशिक्षण केंद्रातून टप्प्याटप्याने हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. विशिष्ट यंत्रणेच्या साह्याने एका ठिकाणी फोन लावल्यावर अवघ्या काही सेकंदात हा फोन कोठून आला आहे, हे संबंधितांना समजणार आहे. त्यानंतर तेथील पोलिस नियंत्रण कक्ष, अग्निशमनदल, महिला हेल्पलाइन, चाइल्ड हेल्पलाइन यांना एकाच वेळेस या कॉलची माहिती दिली जाणार आहे. जेणेकरून घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल होणार आहेत.

सध्या राज्यात पोलिसांसाठी संपर्क करायचा झाल्यास १००, अग्निशमनदल १०१ आणि महिला हेल्पलाइन १०९० या क्रमांकांवर संपर्क साधावा लागतो. या सर्व हेल्पलाइनचे एकत्रीकरण केले जात आहे. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर केंद्र पातळीवर एकच हेल्पलाइन असावी, असा सूर सर्व स्तरातून उमटला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांनुसार आपत्कालीन प्रतिसाद सहाय्य प्रणाली (ईआरएसएस) निर्मितीचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील सर्व भागांचे सध्या 'जिओ टॅगिंग' केले जात आहे. त्याचबरोबर सेंट्रलाइज कंट्रोल रूमला फोन आल्यावर कशा प्रकारे प्रतिसाद द्यायचा, स्थानिक कंट्रोल रूमला फोन आल्यावर काय प्रक्रिया राबवायची याबाबत प्रशिक्षण प्रणाली निश्चित करण्यात आली आहे. या सर्व गोष्टींची पूर्तता झाल्यावरच राज्यातील १०० क्रमांक बंद केला जाणार आहे.

पोलिसांकडील असलेल्या वाहनांचेही तंत्रज्ञानाच्या मदतीने काही अद्ययावतीकरण केले जात आहे. परिणामी कोणत्याही एखाद्या भागात बाका प्रसंग आल्यास सर्व यंत्रणा एकाच वेळेस त्याचा सामना करू शकतील. यासाठी अप्पर पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याची राज्याचे नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या वायरलेस विभागासह अन्य तांत्रिक आणि प्रशिक्षण विभागाच्या प्रमुखांची राज्यस्तरीय समिती यासाठी स्थापन करण्यात आली आहे.


एकाच वेळी सर्व प्रकारची मदत पीडितांना मिळावी यासाठी केंद्र पातळीवर हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ३१ डिसेंबरपर्यंत राज्यात ११२ ही हेल्पलाइन सुरू व्हावी यासाठी प्रयत्नशील आहोत. सेंट्रलाइज कंट्रोल रूममध्ये एका वेळेस किमान ७० ते ८० प्रशिक्षित लोक काम करणार आहेत. त्यामुळे नागरिकांना कमीत कमी वेळात सर्व प्रकारची मदत पोहोचविली जाईल. '११२' सुरू झाल्यावर पुढील काही दिवसांसाठी १०० क्रमांकही क्रमांकही सुरू ठेवण्यात येणार आहे.

- एस. जगन्नाथन, अप्पर पोलिस महासंचालक तथा नोडल ऑफिसर सेंट्रलाइज हेल्पलाइन सिस्टिम

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज