अ‍ॅपशहर

एसटीच्या ताफ्यात नवी 'लालपरी'; दापोडीच्या कार्यशाळेतून ८० बस दाखल होणार

एसटीची पूर्वीची लाल बस असलेली लालपरी आधुनिक पद्धतीने बनविली जात आहे. या नवीन लालपरी बस तयार करण्याचे काम काम पूर्ण झाले आहे. यातील काही बस राज्यातील काही जिल्ह्यांना देण्यात आल्या आहेत.

Edited byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 27 Dec 2022, 10:45 am
पुणे : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागाच्या ताफ्यात नवीन लालपरीची पहिली बस सोमवारी दाखल झाली असून, ती पुणे ते चंद्रपूर मार्गावर रात्री रवाना झाली. जानेवारी अखेरपर्यंत आणखी ८० बस दाखल होणार आहेत. एसटीने दापोडीच्या कार्यशाळेत तयार केलेली ही बस आरामदायी असून, प्रवाशांना साध्या दरातच या बसमधून प्रवास करायला मिळणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pmpl2
एसटीच्या ताफ्यात नवी 'लालपरी'; दापोडीच्या कार्यशाळेतून ८० बस दाखल होणार


पुणे एसटीच्या विभागात एकूण १३ डेपो आहेत. जिल्ह्याबरोबरच राज्याच्या विविध भागांत ८५६ गाड्यांमार्फत एसटीकडून सेवा दिली जाते. करोना व संपानंतर एसटीचे उत्पन्न वाढले असून, पुणे विभागाचे दिवसाला साधारण एक कोटी २५ लाख रुपये उत्पन्न मिळते. एसटीच्या अनेक गाड्या जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे एसटीकडून नवीन बस विकत घेण्याबरोबरच स्वतः दापोडीच्या कार्यशाळेत बस उभारण्याचे काम सुरू आहे. एसटीची पूर्वीची लाल बस असलेली लालपरी आधुनिक पद्धतीने बनविली जात आहे. या नवीन लालपरी बस तयार करण्याचे काम काम पूर्ण झाले आहे. यातील काही बस राज्यातील काही जिल्ह्यांना देण्यात आल्या आहेत. तयार केलेल्या बसपैकी एकूण ८० बस एसटीच्या पुणे विभागाला मिळणार आहे. त्यामुळे पुणे विभागाचा ताफा साडेनऊशे जवळ जाणार आहे. या नव्या बसमध्ये एसटीच्या निमआराम सेवेसारख्या (एशियाड) सर्व सोयी असतील. त्यासाठी एसटीच्या तिकीट दरांत कोणतीही शुल्कवाढ करण्यात आलेली नाही. प्रवाशांना साध्या दरातच प्रवास करता येणार आहे. नवीन बसचा फायदा लांब पल्ल्यांच्या प्रवाशांना होणार आहे.

अशी असेल बस

- बसमधील सिट पुशबॅक व बकेट पद्धतीची

- प्रवाशांसाठी खिडकीच्या उंचीत वाढ

- बसचा दरवाजा ऑटोमेटिक

- बसमध्ये इमर्जन्सी बटन

- प्रवाशांच्या मोबाइल चार्जिंगची सोय

- बसमध्ये प्रवाशांच्या सोईसाठी अनाउन्स सिस्टीम

- बसमध्ये ४७ प्रवासी प्रवास करू शकतात.

नव्याने तयार करण्यात आलेली लालपरीची पहिली बस आज, सोमवारी ताफ्यात दाखल झाली आहे. ती पुणे ते चंद्रपूर मार्गावर सायंकाळी रवाना झाली. जानेवारी अखेरपर्यंत ८० बस दाखल होतील.

- ज्ञानेश्वर रणावरे,

विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी पुणे

एसटी पुणे विभागाची माहिती

१३

एसटी एकूण डेपो

८५६

विभागातील एसटीची संख्या

एक कोटी २५ लाख

दिवसाला मिळणारे साधारण उत्पन्न

८०

नव्याने दाखल होणाऱ्या बस

महत्वाचे लेख