अ‍ॅपशहर

आधार कार्ड जोडणीचा घोळ

प्राप्तिकर विवरण भरण्यासाठी केवळ एक आठवड्याची मुदत राहिली असताना ‘आधार’च्या घोळामुळे नागरिकांची फरपट होत आहे.

Maharashtra Times 22 Jul 2017, 3:00 am
माहिती अपडेटसाठी नोव्हेंबरपर्यंत मुदत; ‘आयटीआर’ भरण्याची अडचण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम aadhar linking problem in pune due to fingerprint mismatch
आधार कार्ड जोडणीचा घोळ


म. टा. प्रतिनिधी, पुणे
प्राप्तिकर विवरण भरण्यासाठी केवळ एक आठवड्याची मुदत राहिली असताना ‘आधार’च्या घोळामुळे नागरिकांची फरपट होत आहे. आधार क्रमांक बँक खात्याशी आणि पॅन कार्डशी जोडणे बंधनकारक आहे. परंतु, ‘आधार’च्या अद्ययावतीकरणासाठी नोव्हेंबर महिन्याची तारीख दिली जात असल्याने नागरिकांना आता आयटीआर भरण्यासाठी अडचण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे, आधार अपडेट करण्यासाठी वणवण भटकणाऱ्या नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

शहरात अत्यंत तुरळक ठिकाणी आधार केंद्र सुरू आहेत. नुकतीच टपाल खात्यानेही त्यांच्या दोन कार्यालयांमध्ये ही यंत्रणा सुरू केली आहे. परंतु, तिथे रोज केवळ दहा ते पंधरा नागरिकांचेच काम होत असल्याने इतरांनी जायचे कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पाच तास थांबूनही ‘आधार’चे अद्ययावतीकरण होत नाही. एखाद्या नागरिकाचा नंबर लागलाच, तर त्याचे ठसे जुळत नसल्याने कार्ड अवैध आहे, असे सिस्टीममधून सांगण्यात येते. त्याला पर्याय काय, अशी विचारणा केली असता तुम्ही क्षेत्रीय कार्यालयात भेटा, असे सांगितले जात असल्याने नागरिकांना प्रचंड धावपळ करावी लागत आहे.

प्राप्तीकर भरण्याची ३१ जुलै ही शेवटची तारीख आहे. १ ऑगस्टच्या पुढे रिटर्न भरल्यास नागरिकांना दंड भरावा लागतो. परंतु, आधार कार्ड अवैध दाखवत असल्याने नागरिकांना ते जोडता येत नाही. त्यामुळे, इन्कम टॅक्स रिटर्नवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आधार कार्डशी पॅन कार्ड आणि बँक खाते जोडणे बंधनकारक आहे. ३१ डिसेंबरच्या आत ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास नागरिकांची बँक खाती अवैध ठरवली जाणार आहेत. पॅन कार्डशी आधार जोडण्याची अंतिम तारीख अद्याप सरकारने जाहीर केलेली नाही. ती जाहीर केल्यानंतर मात्र, आधार आणि पॅन केंद्रांवर नागरिकांची गर्दी होणार आहे. तुर्तास तरी ‘आधार’साठी एका दिवसाला केवळ १५ नागरिकांचे काम होत असल्याने नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

‘आधार’साठी पुणेकरांची वणवण सुरू आहे. टपाल खात्याने पुण्यात केवळ दोनच आधार केंद्रे सुरू केली आहेत. ३५ लाखांहून अधिक असलेल्या लोकसंख्येच्या शहरासाठी ही केंद्रे पुरेशी नाहीत. लक्ष्मी रस्त्यावरील सिटी पोस्ट आणि जनरल पोस्ट ऑफिस या दोन ठिकाणी केवळ ‘आधार’ची यंत्रणा बसवण्यात आली आहे. त्यामुळे ‘आधार’च्या व्यवस्थेत सुसूत्रता येण्यात अडचणी निर्माण होत आहेत. सरकारने आधार कार्डाशी संबंधित समस्या तातडीने दूर कराव्यात अशी मागणी नाकरिकांकडून होत आहे.

बोटांचे ठसे जुळेनात

आधार कार्डवरील नाव आणि पॅन कार्डवरील नाव एकमेकांशी जुळत नसल्याने अनेक जणांचे कार्ड जोडले जात नाही; तसेच आधार घेताना देण्यात आलेले बोटांचे ठसे आणि आताचे ठसे जुळत नसल्यानेही आधार अवैध ठरवले जात आहे. पण याला पर्यायी व्यवस्था काय, असा प्रश्न नागरिकांकडून केला जात आहे. त्याचे उत्तर प्रशासनाकडे नाही.

ज्येष्ठांची पेन्शन रखडली

आधार बँक खात्याशी जोडले गेले नसल्याने शहरातील अनेक ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून बँकेने देऊ केलेली नाही. आधार कार्ड असतानाही हाताच्या ठसे जुळत नसल्याने अनेक ज्येष्ठांकडील कार्ड अवैध ठरवले गेले आहे. त्यामुळे बँकही त्यांना पेन्शन देण्यासाठी तयार नाही. अशा ज्येष्ठांना या वयातही आधार केंद्राचे उंबरे झिजवावे लागत आहेत. शिवाय त्यांना नोव्हेंबर महिन्याची तारीख मिळत असल्याने तोपर्यंत पेन्शन कसी मिळवायची, या प्रश्नाने ज्येष्ठ नागरिक हैराण झाले आहेत.

ज्येष्ठ नागरिकांचे हाल

गेल्या दोन महिन्यांपासून माझी इपीएस पेन्शन रखडली आहे. आधार कार्डावरचे ठसे आणि माझे ठसे जुळत नसल्याने कार्ड अवैध असल्याचे सांगितले जात आहे. त्यावर पर्यायाची विचारणा केली असता, क्षेत्रीय कार्यालयात जाऊन भेटा अशाप्रकारची उत्तरे मिळत आहेत. टीडीएस भरतानाही आधार पॅन कार्डशी जोडले नसल्याने टीडीएस स्वीकारणे बंद केले आहे. अनेक ठिकाणी जाऊन डोळ्यांचे आणि हातांचे ठसे देण्याचा प्रयत्न केला तरीही कार्ड अपडेट होत नाही. त्यामुळे, ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत, असे ज्येष्ठ नागरिक गोपाळ जाखडे यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज