अ‍ॅपशहर

भेसळ करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

अन्नपदार्थांमध्ये होणारी भेसळ, बनावट उत्पादनांद्वारे लोकांच्या जीविताशी खेळ करणाऱ्यांवर नवीन ग्राहक संरक्षण कायद्यानुसार कडक कारवाई केली जाणार आहे. नवीन कायद्यात अशा प्रकारे गुन्हा करणाऱ्यांवर दखलपात्र कारवाई केली जाणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स 23 Jul 2020, 1:29 pm
Vandana.Ghodekar@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम consumer protection


Tweet : @VandanaaMT


पुणे : अन्नपदार्थांमध्ये होणारी भेसळ, बनावट उत्पादनांद्वारे लोकांच्या जीविताशी खेळ करणाऱ्यांवर नवीन ग्राहक संरक्षण कायद्यानुसार कडक कारवाई केली जाणार आहे. नवीन कायद्यात अशा प्रकारे गुन्हा करणाऱ्यांवर दखलपात्र कारवाई केली जाणार आहे. त्याचबरोबर कैदेची आणि दंडाची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे.

नवीन ग्राहक संरक्षण कायद्यात ग्राहक ही व्याख्या व्यापक करण्यात आली आहे. भेसळयुक्त पदार्थ, बनावट उत्पादने करून विकणाऱ्या उत्पादक, वितरकांवर कारवाई होणार आहे. ग्राहकांच्या हक्कांचे आणि अधिकारांचे महत्त्व या कायद्याने आणखी अधोरेखित केले आहे.

ज्येष्ठ वकील अॅड. अभिजित हरताळकर यांनी सांगितले, 'ई-कॉमर्सद्वारे फसवणूक, अन्यायकारक करार लादणाऱ्यांवर नवीन कायद्यातील कलम २ (४६) नुसार कारवाई केली जाणार आहे. या कलमानुसार कडक शिक्षा आणि दंड केला जाऊ शकतो. संबंधित उत्पादक, वितरक, विक्रेत्याचा परवाना रद्द केला जाऊ शकतो. भेसळयुक्त पदार्थ तयार करून त्यांची विक्री करणे ही बाब नवीन कायद्यात गंभीरपणे विचारात घेण्यात आली आहे. त्यासाठी संबंधितांना जबाबदार धरून कडक कारवाई केली जाणार आहे.

या कायद्यातील कलम ९० नुसार, भेसळयुक्त पदार्थामुळे त्रास झाल्यास, सहा महिने शिक्षा आणि एक लाख रुपये दंड, भेसळयुक्त पदार्थामुळे इजा झाल्यास एक वर्षे शिक्षा आणि तीन लाख रुपये दंड, गंभीर इजा झाल्यास सात वर्षे शिक्षा आणि पाच लाख रुपये दंड केला जाणार आहे. भेसळयुक्त पदार्थांमुळे मृत्यू झाल्यास सात वर्षे शिक्षा, आणि दहा लाख रुपये दंड केला जाणार आहे. हा गुन्हा दखलपात्र आणि अजामीनपात्र करण्यात आला आहे.

कलम ९१ नुसार बनावट उत्पादन आणि त्यांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. बनावट उत्पादन असल्यास एक वर्षे शिक्षा, तीन लाख रुपये दंड, गंभीर इजा झाल्यास सात वर्षे शिक्षा, पाच लाख रुपये दंड, बनावट उत्पादनामुळे मृत्यू झाल्यास कमीत कमी सात वर्षे शिक्षा ते जन्मठेप आणि दहा लाख रुपयांपर्यंत दंड केला जाऊ शकतो.


ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ हा प्रभावीपणे राबविल्यास हा ग्राहक चळवळीतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. नवीन कायदा अत्यंत व्यापक आणि विस्तृत असून, ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांना कडक शासन आणि दंड केला जाणार आहे.

- अॅड. अभिजित हरताळकर, ज्येष्ठ वकील

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज