अ‍ॅपशहर

पंचमुखी गणेशमूर्ती

पाच मुख आणि दहा हात असलेला गणपती, त्याच्याबरोबर असलेली स्त्रीरूपातील शक्ती, हे महागणपतीचे लक्षण आहे, हे आपण कालच्या लेखात पाहिले. या महागणपतीच्या प्रतिमेशिवाय पंचमुखी गणपतीच्या इतरही मूर्ती आढळतात. भारताच्या विविध भागांत सापडणाऱ्या या वैशिष्ट्यपूर्ण मूर्तींची ओळख आपण करून घेणार आहोत.

Maharashtra Times 10 Sep 2016, 3:00 pm
- आनंद कानिटकर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम anand kanitakar panchmukhi ganesh heramb
पंचमुखी गणेशमूर्ती

पाच मुख आणि दहा हात असलेला गणपती, त्याच्याबरोबर असलेली स्त्रीरूपातील शक्ती, हे महागणपतीचे लक्षण आहे, हे आपण कालच्या लेखात पाहिले. या महागणपतीच्या प्रतिमेशिवाय पंचमुखी गणपतीच्या इतरही मूर्ती आढळतात. भारताच्या विविध भागांत सापडणाऱ्या या वैशिष्ट्यपूर्ण मूर्तींची ओळख आपण करून घेणार आहोत.
यक्षविनायक या नावाने प्रसिद्ध असलेली काशीची गणेशाची मूर्ती पंचमुखी आणि चार हातांची आहे. या गणपतीच्या पाचही मुखांचे कान आणि दातही वेगवेगळे दाखवलेले आहेत. या विनायकाच्या मधल्या मुखाच्या दातांवर बारीक हत्ती कोरले आहेत. गणपतीच्या चार हातांपैकी दोन हातात सर्प आणि अंकुश आहेत. दातावरचे कोरलेले हत्ती हे या मूर्तीचे वैशिष्ट्य मानले जाते. संशोधकांनी गणेशसहस्रनामातील ‘दंष्ट्रालग्न द्विपघटः’ (ज्याच्या दाताला द्विप म्हणजे हत्तीची घटा लागलेली आहे असा), या पदाशी लावला आहे. अर्थात, याचे स्पष्टीकरण अजून कुठल्याही कथेत मिळालेले नाही.
कोणत्या लक्षणानुसार गणेशाच्या प्रतिमेला हेरंब म्हणायचे, हे प्राचीन ग्रंथांतून नमूद केले आहे. पंचमुख, दहा हात असलेला आणि सिंहावर आरूढ असलेल्या गणेशाच्या प्रतिमेला हेरंब म्हटले जाते. काही ग्रंथांनुसार हा पंचमुखी आणि दशभुज गणेश मूषकारूढ असला, तरी त्याला हेरंब मानले जाते. चार मुखे चार दिशांना आणि पाचवे मुख त्यांच्या वर, आकाशाकडे बघताना दाखवले जाते. ‘शारदातिलक तंत्र’ या ग्रंथामध्ये हेरंबाचे वर्णन पुढीलप्रमाणे केले आहे, ‘सिंह ज्याचे वाहन आहे आणि ज्याच्या भाळावर चंद्र आहे, अशा पंचमुखी व त्रिनेत्री हेरंबाचे मी ध्यान करतो.’
मुन्शीगंज, ढाका (बांगलादेश) येथे एक हेरंबाची काळ्या पाषाणात घडवलेली मूर्ती सापडली आहे. ही मूर्ती ललितासनात सिंहावर आरुढ झालेली आहे. या प्रतिमेला पाच मुखे असून प्रत्येक मुखाला तीन डोळे दाखवले आहेत. त्याच्या दहा हातात पाश, अंकुश, अक्षमाला, मोदकपात्र इ. दाखवले आहेत. दिल्लीतील एका खासगी संग्रहात एक लाकडी पंचमुखी गणेशाची प्रतिमा आहे. या गणपतीच्या हातात परशू, खड्ग, शंख, पाश इ. गोष्टी आहेत. हा गणपती एका द्विमुख राक्षसाच्या खांद्यावर बसलेला आहे. हा राक्षस त्याच्या हाताने गणपतीचे पाय धरून ठेवतो आहे. अर्थात, जरी हा राक्षसावर आरूढ झालेला गणेश असला, तरी काही संशोधक याला हेरंब गणपती मानतात. अशा रीतीने एकाच पंचमुखी, दशभुज गणेशाची महागणपती, यक्षविनायक, हेरंब आणि राक्षसरूढ गणेश, ही रूपे मध्ययुगीन काळात आपल्याला पाहायला मिळतात. गणेश उपासनेचा आग्नेय आशियातील प्रसार आपण पाहणार आहोत.
(लेखक भारतीयविद्या तज्ज्ञ आहेत.)

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज