अ‍ॅपशहर

​ अँजिओप्लास्टी १.२० लाखांत

स्टेंटच्या किमती आवाक्यात आल्याने अँजिओप्लास्टीचा खर्च दीड ते दोन लाखांनी घटला आहे. शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये १.२० लाख रुपयांमध्ये अँजिओप्लास्टी करणे शक्य झाले आहे.

Maharashtra Times 28 Feb 2017, 2:09 am
स्टेंट बसविण्यासाठी खर्चात ४० टक्क्यांनी कपात
महाराष्ट्र टाइम्स.कॉम angioplasty done in only 1 20 lakh rupees
​ अँजिओप्लास्टी १.२० लाखांत


म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्टेंटच्या किमती आवाक्यात आल्याने अँजिओप्लास्टीचा खर्च दीड ते दोन लाखांनी घटला आहे. शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये १.२० लाख रुपयांमध्ये अँजिओप्लास्टी करणे शक्य झाले आहे.

केंद्र सरकारने किंमत घटविल्याने चांगल्या दर्जाचे स्टेंट तीस हजार रुपयांमध्ये उपलब्ध झाले आहेत. शिवाय उच्च वर्गीयांना हवे असणारे महागडे स्टेंटही उपलब्ध आहेत. त्यामुळे गरिबांसह श्रीमंतांचाही फायदा होणार आहे. केंद्र सरकारने स्टेंटच्या किमती कमी केल्या आहेत. साडेसात हजार आणि तीस हजार रुपये असे दोन प्रकारचे स्टेंट उपलब्ध झाले आहेत. ‘पूर्वी स्टेंट बसविण्यासाठी गरीब पेशंटांना अँजिओप्लास्टीचा खर्च दीड ते दोन लाख रुपये येत होता. आता या खर्चात ४० टक्क्यांनी कपात झाली आहे. स्टेंट बसविण्यासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये आता पेशंटला सुमारे १.२० लाख रुपये मोजावे लागणार आहेत,’ अशी माहिती हृदयरोग तज्ज्ञ आणि कार्डिओलॉजी सोसायटी ऑफ इंडियाच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. शिरीष साठे यांनी दिली.

स्टेंटसह अँजिओप्लास्टीचा खर्च पूर्वी ९० हजार रुपये येत होता. आता ऑपरेशनचा साधारण खर्च तोच राहील. मात्र स्टेंटच्या किमती कमी झाल्याने एकूण खर्च कमी होईल. स्वस्तात स्टेंट उपलब्ध होणार असल्याने गरीबांना त्याचा फायदा होईल. त्याशिवाय श्रीमंतांसाठी आवश्यक प्रिमियर स्टेंट उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांनाही फायदा होईल, असा विश्वास डॉ. साठे यांनी व्यक्त केला.
हॉस्पिटल असोसिएशन ऑफ पुणेचे अध्यक्ष डॉ. बोमी भोट म्हणाले,की ‘रुबी हॉस्पिटलमध्ये ३० हजार रुपयांमध्ये स्टेंट उपलब्ध आहेत. सरकारने जाहीर केलेल्या दरात स्टेंट देत आहोत. पूर्वी स्टेंटवगळून अँजिओप्लास्टीचा खर्च ६० ते ६७ हजार रुपये होता. स्टेंटसह संपूर्ण खर्च दोन लाखांपर्यंत जात होता. स्टेंटच्या किमती कमी झाल्याने 'अँजिओप्लास्टीचा खर्च १.२०लाखांपर्यंत येऊ शकतो.’ स्टेंटच्या किमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे अँजिओप्लास्टीचा खर्च कमी झाला आहे. परंतु, स्टेंटच्या किमतींवर विमा कंपन्यांची नजर होती. आता ३० हजार रुपयांपर्यंतचे स्टेंट उपलब्ध आहेत. सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाने आदेश दिले आहेत, असे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. धनजंय केळकर यांनी स्पष्ट केले.

स्टेंटच्या किमती कमी झाल्याने त्याचा सामान्य गरीब पेशंटना फायदा होईल. त्याबाबत सरकारचे कौतुक करावे लागेल. पण, श्रीमंतांना हवे असणारे स्टेंट उपलब्ध होत नसल्याने पुण्याबाहेर अथवा देशाबाहेर पेशंट पाठवावे लागतील. त्यासंदर्भात यापूर्वीच आम्ही सरकारशी बोलणी केली. पण सरकारने आमचे म्हणणे ऐकले नाही. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात हृदयरोग तज्ज्ञांमध्ये नाराजी आहे.
डॉ. एम. एस. हिरमेठ, हृदयरोग तज्ज्ञ व अध्यक्ष, कार्डिओलॉजी सोसायटी ऑफ इंडिया

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज