अ‍ॅपशहर

लाचखोरीत ‘क्लास वन’ वाढले

गेल्या काही वर्षांत राज्यात लाच घेताना अटक केलेल्यांमध्ये ‘क्लास थ्री’मधील सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांचा वरचा क्रमांक असला, तरी या वर्षी लाचखोर ‘क्लास वन’ अधिकाऱ्यांवरील कारवाईत वाढ झाली आहे.

Shrikrishna kolhe | Maharashtra Times 24 Oct 2017, 3:00 am
‘एसीबी’कडून दहा महिन्यांत ९० प्रथम वर्ग अधिकाऱ्यांवर कारवाई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम anti corruption bureau take actions 61 class one officers in bribery case
लाचखोरीत ‘क्लास वन’ वाढले


पुणे : गेल्या काही वर्षांत राज्यात लाच घेताना अटक केलेल्यांमध्ये ‘क्लास थ्री’मधील सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांचा वरचा क्रमांक असला, तरी या वर्षी लाचखोर ‘क्लास वन’ अधिकाऱ्यांवरील कारवाईत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ‘क्लास वन’ अधिकाऱ्यांवर कारवाई केलला अडका गाठण्यात या वर्षी दहा महिन्यांतच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबीला) यश आले आहे. यामध्ये पोलिस विभागातील ‘क्लास वन’ अधिकाऱ्यांवर सर्वाधिक कारवाई करण्यात आली आहे.

राज्यात ‘एसीबी’चे मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नांदेड असे आठ विभाग आहेत. गेल्या दहा महिन्यांमध्ये आठ विभागांत लाचखोरीचे ७२१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये ६६८ गुन्हे सापळा रचून केलेल्या कारवाईचे, तर १६ गुन्हे बेहिशेबी मालमत्तेचे आहेत. इतर भ्रष्टाराचे १८ गुन्हे दाखल आहेत. राज्यात पुणे विभागात सर्वाधिक १५४ गुन्हे दाखल असून त्यानंतर नाशिक विभागाने लाचखोरांवर कारवाईचे शतक पूर्ण केले आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत एसीबीची कारवाई घटत चालली असल्याचे दिसून येत आहे. लाचखोरीमध्ये महसूल व पोलिस विभाग आघाडीवर असल्याचे कारवाई वरून स्पष्ट दिसून येत आहे. गेल्या दहा महिन्यात महसूल विभागातील १६९ लाचखोरीचे प्रकरणे समोर आली आहेत. तर, पोलिस विभागाची १२७ प्रकरणांत ‘एसीबी’ने कारवाई केली आहे.

गेल्या काही वर्षांपासून लाच घेताना सर्वाधिक ‘क्लास थ्री’मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पकडण्यात आले आहे. या वर्षी देखील ‘क्लास थ्री’मधील ५७० सरकारी लोकसेवकांवर ‘एसीबी’कडून कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ८३ लाख ९७ हजार रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. २०१६मध्ये ८८४ ‘क्लास थ्री’मधील लोकसेवाकांना लाच घेताना पकडले होते. त्यांच्याकडून एक कोटी आठ लाख रुपये जप्त करण्यात आले होते.

एकीकडे ‘क्लास थ्री’मधील कारवाई कमी झाली असली, तरी ‘क्लास वन’मधील अधिकाऱ्यांवर कारवाईचे प्रमाण या वर्षी वाढल्याचे दिसून आले आहे. राज्यात गेल्या वर्षी ६३ ‘क्लास वन’ अधिकाऱ्यांना लाच घेताना अटक केली होती. या वर्षी दहा महिन्यातच ६१ ‘क्लास वन’ अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडण्यात आले आहे. त्यामध्ये अकरा ‘क्लास वन’ पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर महसूल विभागातील दहा ‘क्लास वन’ अधिकारी पकडण्यात आले आहेत. अन्य भ्रष्टाचार प्रकरणी २६ ‘क्लास वन’ अधिकारी जाळ्यात सापडले आहेत. तसेच, ‘क्लास टू’मधील ७६ अधिकाऱ्यांना या वर्षी ‘एसीबी’ने पकडले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज