अ‍ॅपशहर

सात महिन्यांनी सुटला गुन्ह्याचा गुंता

वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून हाणामाऱ्या झाल्याची अनेक प्रकरणे बघायला मिळतात. तसेच हे एक प्रकरण. कामधंदा करत नसल्याने मोठ्या भावाने लहान भावाच्या वाट्याला येणारी जमीन त्याच्या मुलाच्या नावावर केली. यामुळे चिडलेल्या लहान भावाने मोठ्या सख्ख्या भावाचा थेट खून करण्याचे प्लॅनिंग केले. त्यासाठी हस्तकांकरवी भावावर गोळीबारदेखील केला. यात भाऊ थोडक्यात बचावला खरा, मात्र हल्लेखोर कोण हा सवाल कायम होता. तपासात कोणताही पुसटसाही धागा नसताना गुन्हे शाखेने सात महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर आरोपींना कारागृहातून अटक केली आहे.

Maharashtra Times 27 Dec 2016, 3:09 am
Rohit.Athavale@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम arrested after seven months
सात महिन्यांनी सुटला गुन्ह्याचा गुंता


Tweet : @AthavaleRohitMT

पिंपरी : वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून हाणामाऱ्या झाल्याची अनेक प्रकरणे बघायला मिळतात. तसेच हे एक प्रकरण. कामधंदा करत नसल्याने मोठ्या भावाने लहान भावाच्या वाट्याला येणारी जमीन त्याच्या मुलाच्या नावावर केली. यामुळे चिडलेल्या लहान भावाने मोठ्या सख्ख्या भावाचा थेट खून करण्याचे प्लॅनिंग केले. त्यासाठी हस्तकांकरवी भावावर गोळीबारदेखील केला. यात भाऊ थोडक्यात बचावला खरा, मात्र हल्लेखोर कोण हा सवाल कायम होता. तपासात कोणताही पुसटसाही धागा नसताना गुन्हे शाखेने सात महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर आरोपींना कारागृहातून अटक केली आहे.

लातूर येथे एका कुटुंबाची वडिलोपार्जित जागा आहे. त्यातच यातील मोठ्या भावाच्या राजकीय पार्श्वभूमीमुळे या कुटुंबाकडे नेहमीच आसपासच्या परिसरातील नागरिकांचे लक्ष असायचे. परंतु लहान-मोठ्या भावांचा जमिनीवरून सुरू असलेला वाद अनेकदा विकोपाला गेला होता. लहान भावाची गुन्हेगारांमधील ऊठबस आणि रिकामटेकडेपणा यामुळे मोठ्या भावाने त्याच्या वाट्याची जमीन त्याच्या मुलाच्या नावावर केली. याचाच राग अनावर होऊन लहान भाऊ या ना त्या कारणाने मोठ्या भावाच्या जिवावर उठत होता. मोठ्या भावाची गाडी जाळ, त्याचा अपघात घडवून आण, शिवीगाळ-हाणामारी तर नित्याचीच असे अनेक प्रकार लातूरमधील या कुटुंबात घडत होते.

याला कंटाळून मोठ्या भावाने अखेर आपले बिऱ्हाड पिंपरी-चिंचवडला हलविले. यात त्याचा राजकीय प्रवास सुरू होता आणि लहान भावाची गुन्हेगारी कृत्येही सुरूच होती. अशातच एक दिवस चिखली येथून जाताना एका संघटनेचा पदाधिकारी असलेल्या व्यक्तीवर गोळीबार झाल्याचा फोन पोलिसांना आला. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने गोळीबार करणाऱ्याचा नेम चुकल्याने कोणाला इजा झाली नव्हती. परंतु हा गोळीबार कोणी केला, हल्ला होण्यामागे राजकीय कारण की पूर्ववैमनस्य याचा थांगपत्ता लागत नव्हता. तसेच याबाबत फिर्याद देताना त्याने कथन केलेल्या जीवनप्रवासाने पोलिस अधिकच चक्रावून गेले होते.

पोलिसांनी काही शक्यता तपासून पाहिल्यादेखील होत्या. परंतु त्यांचा या घटनेशी संबंध जोडला जात नव्हता. दररोजच्या घटनांच्या तपासातच या प्रकरणाकडे पोलिसांचे काही अंशी दुर्लक्षदेखील झाले होते. त्यातच हा हल्ला झाला, तेव्हा ‘बहीण-मेव्हण्याला शेवटचे बघून घे’ असा फोन कुटुंबातील सदस्याला येऊन गेल्याची माहिती गुन्हे शाखेच्या तपास पथकाला मिळाली. याबाबत पोलिसांनी तक्रारदाराकडे चौकशी केली. तेव्हा घटनेच्या दुसऱ्या दिवशी ‘थोडक्यात वाचला आहे, बहीण-मेव्हण्याला शेवटचे बघून घे’ असा धमकीवजा सल्ला देणारा फोन येऊन गेल्याचे तक्रारदाराने ‘गुन्हे शाखा युनिट चार’चे वरिष्ठ निरीक्षक आर. एम. तोडकर यांना सांगितले. परंतु कोणी, कोणाला, कधी व किती वेळा फोन केला हे समजत असल्याची माहिती असल्याने हल्लेखोराने हा फोन कॉइन बॉक्सवरून केला होता. त्यामुळे तपासात अडथळे येत होते.

फोन करणाऱ्याचा आवाज ओळखीचाच असल्याची माहितीदेखील तक्रारदाराच्या नातेवाइकाने पोलिसांना दिली होती. दरम्यान, हा हल्ला कोणी केला असावा याबाबत तक्रारदाराने काही लोकांवर संशयदेखील व्यक्त केला होता. या प्रकरणाचा तपास करताना सहायक निरीक्षक नितीन भोयर, फौजदार विलास पालांडे यांनी तपास कर्मचारी शिवाजी सांबारे, प्रमोद वेताळ, संजय गवारे, अमित गायकवाड, गणेश काळे आदींच्या पथकासह लातूर ते चिखली आणि फोन आलेले ठिकाण म्हणून भोसरी या भागावर लक्ष केंद्रित केले होते.

तक्रारदाराच्या भावाने काही महिन्यांपूर्वी एकाला लुटल्याची माहिती तपासावेळी पोलिसांना समजली. तसेच या वेळी त्याने गोळीबारदेखील केला होता. या प्रकरणात तो साथीदारांसह तुरुंगामध्ये शिक्षा भोगत आहे. त्याचबरोबर ज्या वेळी चिखली येथे गोळीबार झाला, त्या दिवसाच्या तीन दिवस आधीपासून तो लातूर येथून गायब असल्याचेही समजले. पोलिसांनी प्रथम लातूर येथील घटनेचा मागोवा घेण्यास सुरवात केली. तेव्हा त्या प्रकरणातील तक्रारदाराकडे चौकशी केली असता, आरोपींनी फुशारकी मारल्याचे समोर आले. पोलिसांना लूटमारीची माहिती कळवल्याने त्याच्यावर गोळीबार झाला होता. गोळीबार करण्यापूर्वी हल्लेखोरांनी धमकावताना पुण्यात कशा पद्धतीने गोळीबार केला आणि पोलिस अजून आमच्यापर्यंत आले नाहीत, अशा अनेक फुशारक्या मारल्या होत्या, असे पोलिसांना कळले.

गोळीबार करण्याचे प्लॅनिंग चार दिवसांपासून सुरू होते. त्यासाठी आरोपी भोसरी येथे राहत होते. या काळात मोबाइल बंद ठेवूनच हालचाली सुरू होत्या, अशा अनेक बाबी आरोपींनी लातूरमधील त्या तक्रारदाराला धमकावताना कथन केल्या होत्या. अनेकांच्या चौकशीतून समोर आलेले तथ्य आणि लातूर-पुणे घटनेच्या तपासातील कड्या जुळवत पोलिसांनी तुरुंगामधून आरोपींना ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी करताना ‘भावाला काही झाले की तो माझेच नाव घेतो, मी तर या कालावधीत बाहेरगावी फिरायला गेलो होतो,’ असे भासवण्याचा त्याचा प्रयत्न होता. तो गुन्हे शाखेच्या खाक्यापुढे टिकला नाही आणि सात महिन्यांनंतर या प्रकरणाला वाचा फोडण्यात पोलिसांना यश आले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज