अ‍ॅपशहर

पोलिसांचा संशय खरा ठरला,चौकशीतला एक मुद्दा टर्निंग पॉईंट ठरला, मित्रांनीच प्रफुल्लला संपवलं

Crime News: बारामती येथील एका तरुणाचा मृतदेह दौंड तालुक्यातील जिरेगाव येथे आढळून आला होता. या घटनेचा पोलिसांनी अवघ्या ८ तासांत छडा लावला आहे. या तरुणाच्या तीन मित्रांनीच त्याची हत्या करुन त्याचा मृतदेह फेकल्याचं समोर आलं आहे.

Authored byदीपक पडकर | Edited byनुपूर उप्पल | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Jan 2023, 12:18 am
पुणे: बारामती येथील प्रफुल्ल उर्फ मोनू राजेंद्र बारवकर या युवकाची हत्या करून त्याचा मृतदेह दौंड तालुक्यातील जिरेगाव हद्दीत टाकण्यात आला होता. याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर अवघ्या आठ तासातच पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. किशोर उर्फ मोन्या सोमनाथ खंडाळे, शुभम उर्फ बाबा उद्धव कांबळे, गणुजी उर्फ आबा रमेश खंडाळे तिघेही ( रा.कुरकुंभ ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम arrest


पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मयत प्रफुल्ल आणि वरील आरोपी हे दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील एका हॉटेलमध्ये एकत्र दारु पिण्यासाठी बसले होते. यावेळी त्यांच्यात दारू प्यायल्यानंतर वाद झाल्यामुळे आरोपींनी प्रफुल्ल याला दौंड - कुरकुंभ रस्त्यावरील कुरकुंभ घाटात नेऊन जीवे मारुन मृतदेह कुरकुंभ बारामती रस्त्यावरील जिरेगाव हद्दीतील रस्त्याच्या कडेला टाकून दिला.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासाची वेगवान चक्रे फिरवत मयत प्रफुल्ल याच्या मित्रांकडे चौकशी केली असता त्यांनीच खून केल्याची कबुली दिली. दौंड पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने सदरचा गुन्हा अवघ्या आठ तासात उघड करून तिघांना अटक केली.

पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक अंकित गोयल, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, अमित सिद पाटील, सहाय्यक फौजदार तुषार पंदारे, काशिनाथ राजपुरे, पोलीस हवालदार जनार्दन शेळके, असिफ शेख, राजू मोमीन, पोलीस नाईक योगेश नागरगोजे, पोलीस शिपाई अक्षय सुपे, धिरज जाधव आदींनी ही कामगिरी केली.

महत्वाचे लेख