अ‍ॅपशहर

बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश

अॅपल व आयपॉडवर वापरण्यात येणारे ब्राउझर क्रॅश झाल्याचे सांगून अमेरिकी नागरिकांना गंडा घालणाऱ्या खराडी येथील बोगस कॉल सेंटरचा सायबर सेलने पर्दाफाश केला आहे.

Maharashtra Times 15 Jan 2018, 3:00 am
१७५ जणांची दहा लाखांची फसवणूक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bogus call center busted by pune police cyber cell at kharadi
बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश


म. टा. प्रतिनिधी, पुणे
अॅपल व आयपॉडवर वापरण्यात येणारे ब्राउझर क्रॅश झाल्याचे सांगून अमेरिकी नागरिकांना गंडा घालणाऱ्या खराडी येथील बोगस कॉल सेंटरचा सायबर सेलने पर्दाफाश केला आहे. कॉल सेंटर चालविणाऱ्या दोन उच्च शिक्षित तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी दोनशे अमेरिकी नागरिकांना गंडा घालून दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
रोहित रामलाल माथूर (वय २९, रा. बावधन) आणि आदित्य सदानंद काळे (वय २९, रा. खराडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. कुणाल फतवाणी हा त्यांचा साथीदार पसार झाला आहे. खराडी परिसरातील एका इमारतीत व्ही. टेक सोल्युशन नावाने बोगस कॉल सेंटर सुरू आहे. या ठिकाणाहून अमेरिकी नागरिकांना त्यांच्या मोबाइलमधील व्हायरस काढून देण्याच्या बहाण्याने गंडा घातला जात आहे, अशी माहिती मिळाल्यानंतर सायबर सेलचे पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी छापा टाकण्याचे आदेश दिले. पोलिस निरीक्षक गजानन पवार, सोनाली फटांगरे यांच्या पथकाने छापा टाकला. त्या वेळी पोलिसांनी रोहित माथूर व आदित्य काळे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे तपास केला असता, त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी अशा प्रकारे १७५ अमेरिकी नागरिकांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या ठिकाणावरून सहा हार्डडिस्क, एक लॅपटॉप, वायफाय राउटर असा मुद्देमाल जप्त केला आहे.

आरोपी उच्चशिक्षित

पुण्यातील एका नामांकित कॉलेजमधून माथूर याचे बॅचलर इन इन्फर्मेशन टेक्नॉलिजी व आदित्य काळे याचे बॅचलर इन फॉरेन ट्रेडचे शिक्षण घेतले आहे. रोहितने शिक्षणानंतर दिल्ली येथे दोन वर्षे नोकरी केली आहे. त्यानंतर तो पुण्यात आला. दोघेही हडपसर परिसरातील एका कंपनीत नोकरीला होते. या ठिकाणी दोघांची ओळख झाली. त्यानंतर त्यांनी ऑगस्ट २०१७पासून खराडीत भागीदारीमध्ये बोगस कॉल सेंटर सुरू करून नागरिकांना गंडा घालण्यास सुरुवात केल्याची माहिती सायबर सेलकडून देण्यात आली.

अशी करत होते फसवणूक

अमेरिकेतील एका कंपनीशी दोघांनी टायअप केले होते. ती कंपनी अमेरिकी नागरिक वापरत असणाऱ्या अॅपल आणि आयपॉड मोबाइलमधील एका ब्राउझरला क्रॅश करणारा व्हायरस तयार करते. ते हा व्हायरस नागरिकांच्या मोबाइलमध्ये सोडत. त्यानंतर तीच कंपनी संबंधित नागरिकांना आरोपी रोहित माथूर व काळे यांच्याबाबात माहिती देत असे, तसेच व्हायरस काढण्यासाठी संपर्क करण्यासाठी भाग पाडत असे. हा व्हायरस काढून देण्यासाठी शंभर डॉलर घेतले जात. पैशांसाठी नागरिकांना शंभर डॉलर किमतीचे आयट्यून कार्ड घेण्यास सांगितले जात होते. ते कार्ड घेतल्यानंतर त्यावरील क्रमांक व्हाट्‌सअपद्वारे मिळवला जाई. त्यानंतर रोहित माथूर व काळे हे त्यांचा राज्यस्थानातील साथीदार फतवाणी याला हा क्रमांक देत. तो त्याचे कमिशन घेऊन उर्वरित पैसे या दोघांना देत होता, अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज