अ‍ॅपशहर

बीआरटी मार्गावर पादचारी पूल?

नागरिकांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा, यासाठी नगररोड बीआरटी मार्गावर पाच पादचारी पूल उभारण्याचा विचार महापालिका प्रशासनाने सुरू केला आहे. येत्या सोमवारी (२३ मे) होणाऱ्या मुख्य सभेत हा विषय चर्चेसाठी येऊन निर्णय होण्याची शक्यता आहे. या पादचारी पुलांमुळे नागरिकांना सुरक्षित रस्ता ओलांडणे शक्य होणार आहे.

Maharashtra Times 20 May 2016, 4:01 am
सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्यासाठी उपाययोजना प्रस्तावित
महाराष्ट्र टाइम्स.कॉम brt accident overbridge pune
बीआरटी मार्गावर पादचारी पूल?

म. टा. प्रतिनिधी, पुणे
नागरिकांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा, यासाठी नगररोड बीआरटी मार्गावर पाच पादचारी पूल उभारण्याचा विचार महापालिका प्रशासनाने सुरू केला आहे. येत्या सोमवारी (२३ मे) होणाऱ्या मुख्य सभेत हा विषय चर्चेसाठी येऊन निर्णय होण्याची शक्यता आहे. या पादचारी पुलांमुळे नागरिकांना सुरक्षित रस्ता ओलांडणे शक्य होणार आहे.
गेले अनेक वर्षापासून पूर्ण होऊन वाहतुकीसाठी बंद असलेली नगर रोड बीआरटी महापालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी सुरू केली आहे. उद्घाटन केल्यापासून या बीआरटी मार्गावर सातत्याने अपघात घडत आहेत. काही ठिकाणी अरुंद झालेला बीआरटी मार्ग, रस्त्यांवर नसलेले गतिरोधक, झेब्रा क्रॉसिंग आणि पादचारी मार्गांची अपुरी व्यवस्था येथे असल्याने अपघात घडत असल्याची तक्रार करण्यात येत आहे. बीआरटी मार्गातून जाण्यास बंदी असतानाही त्याकडे सर्रास दुर्लक्ष करून खासगी वाहने घुसखोरी करत असल्याने अपघात घडत असल्याचे समोर आले आहे. रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांसाठी हा मार्ग सुरक्षित नसल्याने अपघात होतात. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी गुरुवारी सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी केली.
नगरसेवक योगेश मुळीक, शिवसेना गटनेते अशोक हरणावळ, संजय भोसले यांनी बीआरटी मार्गातील अपघातबाबत प्रशासनाला जाब विचारला. प्रशासनाला सुरक्षितेसाठी उपाययोजना करता येत नसतील तर, हा बीआरटी मार्ग बंद करावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी नगररोड बीआरटी मार्गावर पादचारी पूल उभारता येतील. राम नगर, विमान नगर, चंदन नगर, शास्त्री नगर या भागात पादचारी पूल उभाण्याचा विचार सुरू आहे. सोमवारी होणाऱ्या मुख्य सभेत हा प्रस्ताव आणून त्याला मंजुरी दिली जाईल, असे महापौर प्रशांत जगताप यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज