अ‍ॅपशहर

बीआरटीचा विस्तार रखडला

पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी बीआरटीचे नेटवर्क भक्कम करण्याची गरज व्यक्त करणारे माननीय आपल्या प्रभागात मात्र बीआरटी योजनेत त्रुटींचा पाढा वाचत नकारात्मक भूमिका घेत असल्याचे समोर आले आहे.

Maharashtra Times 18 Jan 2018, 12:12 am
नगरसेवकांची योजनेबद्दल नाकारात्मक भूमिका
महाराष्ट्र टाइम्स.कॉम brt scheme opposed by corporators in pune
बीआरटीचा विस्तार रखडला


म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी बीआरटीचे नेटवर्क भक्कम करण्याची गरज व्यक्त करणारे माननीय आपल्या प्रभागात मात्र बीआरटी योजनेत त्रुटींचा पाढा वाचत नकारात्मक भूमिका घेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहरातील बीआरटीचा विस्तारही रखडल्याचे आढळून आले आहे.
गेल्या दहा वर्षांच्या सत्तेच्या काळात सोलापूर रस्त्याचे रुंदीकरणाचा प्रश्न मार्गी न लावणाऱ्या माननीयांकडून आता हडपसर बीआरटीच्या विरोधात सह्यांची मोहीम हाती घेण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सोलापूर रस्त्यावर बीआरटी मार्गामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. त्यामुळे या बीआरटीच्या सुधारणांना विरोध दर्शविण्यात येत आहे. या मार्गावर खासगी वाहनांसाठी अधिकची लेन सुरू करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. त्यासाठी स्थानिक नगरसेवक योगेश ससाणे यांनी पुढाकार घेतला आहे. पुणे शहरातील बीआरटीचे नेटवर्क वाढविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेतला होता. पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या लांबीच्या बीआरटीच्या लेन तयार करण्यात आल्या आहेत. मात्र, त्याच राष्ट्रवादी काँग्रेसकडून हडपसर बीआरटीला विरोध होत असल्याचे चित्र दिसते आहे.
फातिमानगर ते मगरपट्टा चौक या अडीच किलोमीटरच्या मार्गातील बीआरटीला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद असला, तरी खासगी वाहने वापरणाऱ्यांकडून विरोध होत आहे. शहरात बीआरटीचे जाळे हवे; मात्र, तीच बीआरटी आपल्या प्रभागात-विभागात असेल, तर त्याला माननीयांकडून विरोध होताना दिसत आहे. खासगी वाहतूक व्यवस्थेला पर्याय म्हणून बीआरटीचे जाळे विणण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी दहा वर्षांपूर्वी कात्रज ते हडपसर हा बीआरटीचा पहिला मार्ग सुरू करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेच्या काळात या ठिकाणच्या बीआरटीकडे केलेल्या दुर्लक्षामुळे स्थानिकांना त्रास होत असल्याची टीका सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून करण्यात येत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज