अ‍ॅपशहर

कॅलिफोर्नियाच्या आजी पुण्यात हरवतात तेव्हा...

अमेरिकेतील कॅलिफोर्नियात राहणाऱ्या आणि अनिवासी भारतीय असणाऱ्या ७६ वर्षीय आजी पुण्यातील ‘फॅमिली फ्रेंड’कडे राहण्यास आल्या आणि बुधवारी सकाळी चक्क हरवल्या. त्यांच्या अचानक गायब होण्यामुळे सगळ्यांची पाचावर धारण बसली.

Maharashtra Times 25 Aug 2016, 10:13 am
मॉर्निंग वॉकसाठी गेल्या अन् रस्ता हरवून बसल्या
महाराष्ट्र टाइम्स.कॉम californias grand mother forget road in pune
कॅलिफोर्नियाच्या आजी पुण्यात हरवतात तेव्हा...


म. टा. प्रतिनिधी, पुणे

अमेरिकेतील कॅलिफोर्नियात राहणाऱ्या आणि अनिवासी भारतीय असणाऱ्या ७६ वर्षीय आजी पुण्यातील ‘फॅमिली फ्रेंड’कडे राहण्यास आल्या आणि बुधवारी सकाळी चक्क हरवल्या. त्यांच्या अचानक गायब होण्यामुळे सगळ्यांची पाचावर धारण बसली.

सॅलिसबरी पार्कमधून मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेल्या आजींचा रस्त्याचा गोंधळ उडाल्याने त्या कॅम्पमधील सेंटर स्ट्रीट पोलिस चौकीत पोहोचल्या. आजींनी सांगितलेल्या एका नावाच्या आधारे पोलिसांनी त्यांचा पत्ता शोधला आणि घरच्यांचा जीव भांड्यात पडला. रुक्मिणी राजगोपालन (वय ७६, रा. कॅलिफोर्निया) असे हरवलेल्या आजींचे नाव आहे. त्या प्रथमच पुण्यात आल्या होत्या. सॅलिसबरी पार्कमधील ‘फॅमिली फ्रेंड’कडे त्यांचा मुक्काम होता. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे त्या बुधवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडल्या. चालत चालत त्या कॅम्पमध्ये पोहोचल्या. तेथे आल्यानंतर परतीचा रस्ता सापडत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांची ही अवस्था पाहून स्थानिक नागरिकाने त्यांना लष्कर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सेंटर स्ट्रीट पोलिस चौकीत नेले. तेथे पोलिसांनी त्यांच्याकडे माहिती विचारली. नाव आणि अमेरिकेतील ठिकाण या पलीकडे त्यांना फारसे काही सांगता आले नाही.
त्यांनी घराबाहेर पडताना मोबाइल, पर्स यापैकी काहीच बरोबर घेतले नव्हते. तसेच, आपण नेमके कोणाकडे राहात आहोत, हेदेखील त्यांना आठवेना. त्यानंतर पोलिसांनी त्यांना सरकारी जीपमध्ये बसवून कॅम्पमध्ये फिरवले आणि काही आठवते आहे का अशी विचारणा केली. यावेळीही त्यांना घराचा रस्ता आठवला नाही. पुन्हा पोलिस चौकीत आल्यानंतर त्यांना चहा-बिस्कीट देण्यात आले. त्यानंतर आपण तनेजा नामक परिवाराकडे उतरल्याचे त्यांनी पोलिसांना ​सांगितले.
त्यानंतर पोलिसांनी त्वरित एसटीडी बूथ गाठून टेलिफोन डिरेक्टरी आणली. सहायक निरीक्षक विठ्ठल साळुंके यांनी त्यातील तनेजा आडनावाचा शोध घेऊन त्यांना संपर्क साधण्यास सुरुवात केली. त्यातील एक कॉल सॅलिसबरी पार्कमधील लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) डॉ. वेदप्रकाश तनेजा यांना करण्यात आला. त्यावेळी ते घरी नव्हते. आपल्याकडे उतरलेल्या श्रीमती राजगोपालन हरवल्याची तक्रार देण्यासाठी ते नेमके स्वारगेट पोलिस ठाण्यात गेले होते. तेथून घरी आले असता, लष्कर पोलिस ठाण्यातून फोन आल्याचे त्यांना समजले. त्यानंतर त्यांनी वेळ न दवडता सेंटर स्ट्रीट पोलिस चौकी गाठली. तेथे आजींना पाहून त्यांचा जीव भांड्यात पडला.
..
आजींची मायदेशी रवानगी
डॉ. तनेजा रांची मिलिटरी हॉस्पिटलमध्ये असताना राजगोपालन तेथे नर्स म्हणून कार्यरत होत्या. ही घटना साधारणतः पन्नास वर्षांपूर्वीची आहे. एके दिवशी राजगोपालन डॉक्टरांना भेटल्या. आपल्याला अमेरिकेत नोकरीसाठी जायचे असल्याने तुम्ही शिफारस करावी, अशी विनंती त्यांनी केली. डॉ. तनेजा यांनी तशी शिफारस केल्याने राजगोपालन अमेरिकेला गेल्या. तेथे त्यांनी पीएचडी केली. त्यानंतर त्या तेथेच स्थायिक झाल्या. त्यानंतर प्रथमच त्यांनी पुण्यात पाय ठेवला होता. या घटनेनंतर डॉ. तनेजा यांनी आजींची बुधवारी सायंकाळी कॅलिफोर्नियाला रवानगी केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज