अ‍ॅपशहर

'ई-व्हाउचर्स' घ्या अन् लसीकरण करा

औद्योगिक कंपन्यांतील कर्मचारी, सहकाऱ्यांचे लसीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने 'ई-व्हाउचर्स'ची योजना पुढे आणली आहे. कं

Authored byमुस्तफा आतार | महाराष्ट्र टाइम्स 23 Jul 2021, 4:10 pm
पुणे : औद्योगिक कंपन्यांतील कर्मचारी, सहकाऱ्यांचे लसीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने 'ई-व्हाउचर्स'ची योजना पुढे आणली आहे. कंपन्यांनी कोणत्याही बँकेशी करार करून त्यांच्याकडून लशीची रक्कम भरली, की व्हाउचर्स मिळणार असून, ते कंपन्या कर्मचाऱ्यांना देऊ शकणार आहेत. त्यानंतर कर्मचारी जवळच्या खासगी रुग्णालयात जाऊन त्या व्हाउचर्सद्वारे लसीकरण करू शकतील. त्यामुळे लसीकरणाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ई-व्हाउचर्स घ्या अन् लसीकरण करा


'अनेक खासगी रुग्णालयांत लसीकरण केंद्रे आहेत. त्या केंद्रावर नागरिकांना पैसे देऊन लस घ्यावी लागत आहे. त्याच धर्तीवर आता नागरिकांसह विशेषतः औद्योगिक कंपन्या, कॉर्पोरेट कंपन्यांना त्यांचे कर्मचारी, सहकारी, भागीदार; तसेच अन्य व्यक्तींना ई-व्हाउचर्स घेता येणार आहेत. यासाठी कंपन्यांना संबंधित बँकांशी करार करावा लागणार आहे. व्हाउचरचे स्कॅनिंग करून ते 'अॅप्रूव्ह' झाले, की त्यानंतर संबंधिताच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा होणार आहे. कंपन्यांना सामाजिक निधीतून (सीएसआर) लसीकरणासाठी ही रक्कम खर्च करता येईल. कोणत्या बँकेशी करार झाला, याची माहिती संबंधित कंपन्यांना द्यावी लागेल. राज्यांना त्याच्या अंमलबजावणीच्या सूचना दिल्या आहेत,' अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. राज्याचे लसीकरण अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी त्याला दुजोरा दिला आहे.

केंद्र सरकारने ई-व्हाउचरची संकल्पना सुरू करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. कॉर्पोरेट कंपन्यांसह कर्मचाऱ्यांसाठी ही संकल्पना उपयुक्त ठरेल. त्यामुळे लसीकरणासाठी एकाच वेळी गर्दी होणार नाही. त्याच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शक तत्त्वांची प्रतीक्षा आहे.

- डॉ. दिलीप पाटील,

राज्य लसीकरण अधिकारी

ई-व्हाउचर्सची वैशिष्ट्ये

- कॉर्पोरेट कंपन्यांना त्यांच्या कर्मचारी, सहभागीदार, सहकारी; तसेच इतरांना लसीकरणासाठी ई-व्हाउचर देणे सहज शक्य.

- ई-व्हाउचर हे संबंधित बँकेच्या नावाचे असेल. ते लसीकरण केंद्रावर दिल्यास त्यांच्याकडून ते स्वीकारले जाईल.

- कोणत्याही खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर जाऊन व्हाउचरद्वारे लस घेता येणार.

- ई-व्हाउचरची मुदत ३१ मार्च २०२२पर्यंत असेल.

- एका मोबाइलवर किमान १० ई-व्हाउचर देता येऊ शकतील.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज