अ‍ॅपशहर

​ धर्मादाय हॉस्पिटल गरिबांच्या दारी

खासगी हॉस्पिटलमध्ये गरिबांना उपचार घेणे परवडत नसल्याच्या पार्श्वभूमीवर आता पुण्यातील खासगी धर्मादाय हॉस्पिटल गरीब पेशंटचा शोध घेणार आहे. रस्त्यावरील भिकारी, झोपडपट्टीसह गरीब पेशंटचा शोध घेऊन त्यांना बड्या हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार देण्यात येणार आहेत.

Maharashtra Times 19 Nov 2017, 5:29 am
पुण्यासह राज्यभर तीन डिसेंबरला मोफत उपचार होणार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम charitable hospitals will arrange free check up for poors
​ धर्मादाय हॉस्पिटल गरिबांच्या दारी


म. टा. प्रतिनिधी, पुणे

खासगी हॉस्पिटलमध्ये गरिबांना उपचार घेणे परवडत नसल्याच्या पार्श्वभूमीवर आता पुण्यातील खासगी धर्मादाय हॉस्पिटल गरीब पेशंटचा शोध घेणार आहे. रस्त्यावरील भिकारी, झोपडपट्टीसह गरीब पेशंटचा शोध घेऊन त्यांना बड्या हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार देण्यात येणार आहेत.

मुंबई वगळून पुण्यासह राज्यातील विविध शहरांमध्ये तीन डिसेंबरला हा प्रयोग धर्मादाय आयुक्तालयामार्फत राबविण्यात येणार आहे. धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी हा उपक्रम राज्यभर राबविण्याचे आदेश दिले आहेत.

सरकारी सवलतीवर उभारलेल्या खासगी धर्मादाय हॉस्पिटलमध्ये गरिबांना उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी होत आहेत. त्या तक्रारींची दखल घेऊन धर्मादाय हॉस्पिटलमध्ये गरिबांना मोफत उपचार देण्यास सुरुवात करण्यात आली. धर्मादाय हॉस्पिटलमध्ये गरिबांसाठी योजना राबविणे अपेक्षित आहे. मात्र, संबंधित हॉस्पिटलांना या सेवेचा विसर पडत चालल्याने धर्मादाय आयुक्तालयाकडून योजनांची अंमलबजावणी हाती घेण्यात आली आहे. वैद्यकीय उपचार महागडे झाल्याने त्यांचा लाभ घेण्यास गरीब पेशंट धजावत नाही. पर्याय नसल्याने त्यांना कर्ज काढून खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे लागतात.

‘गरिबांना खासगी हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार मिळावेत यासाठी धर्मादाय आयुक्तालयाने पुण्यासह राज्यात येत्या तीन डिसेंबरला धर्मादाय हॉस्पिटल, गरिबांच्या दारी’ उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील विविध रस्त्यावरील भिकारी, झोपडपट्टीसह खासगी हॉस्पिटलचे डॉक्टर अॅम्ब्युलन्सद्वारे गरीब पेशंटचा शोध घेतील. या मोहिमेत ५६ धर्मादाय हॉस्पिटलमधील डॉक्टर, तज्ज्ञ मोफत उपचार देतील. पुण्यात सुमारे १५ हजार गरिबांना मोफत उपचार देण्याचे उद्दिष्ट आहे,’ अशी माहिती सहायक धर्मादाय आयुक्त नवनाथ जगताप यांनी दिली.

तीन डिसेंबरला रस्त्यावरील भिकाऱ्यांपासून ते गरिबांपर्यंत त्यांच्या तक्रारीनुसार तपासणी करण्यात येणार आहे. आजाराचे निदान झाल्यास त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार होणार आहेत. राज्यात आजमितीला ५०६ धर्मादाय हॉस्पिटल आहेत. मुंबईत तीन नोव्हेंबरला हा प्रयोग राबविण्यात आला. त्यानंतर आता पुण्यासह राज्यात हा प्रयोग राबविण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

धर्मादाय हॉस्पिटल गरिबांच्या दारी य़ा उपक्रमांतर्गत धर्मादाय सहआयुक्त शिवाजीराव कचरे २२ नोव्हेंबरला पुण्यातील सर्व धर्मादाय हॉस्पिटलच्या विश्वस्तांची बैठक घेणार आहेत. त्यात या उपक्रमाची दिशा निश्चित केली जाईल. त्यामध्ये एका ठिकाणी गरिबांसाठी शिबिरांचे आयोजन केले जाईल. पुणे विभागातील सातारा, सोलापूर, नगर जिल्ह्यातील धर्मादाय आयुक्तालयांना अधिकाधिक पेशंटवर उपचार कऱण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नवनाथ जगताप, सहायक धर्मादाय आयुक्त

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज